loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील भटवाडीतील खड्ड्यांनी दिवाळीतही छळले; नागरिक संतप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहराच्या भटवाडी परिसरातील रस्त्यावर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी गणेश चतुर्थीपूर्वी खोदलेले खड्डे दिवाळी आली तरी बुजवण्यात आलेले नाहीत. नवरात्रोत्सव, दसरा आणि आता दिवाळीसारखे मोठे सण नागरिकांना या धोकादायक खड्ड्यांतूनच काढावे लागत असल्याने नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ​भटवाडीतील लक्ष्मीनारायण मंदिरापासून ते बोरजिस वाड्यापर्यंतच्या वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. अनेक दुचाकीस्वार आणि वाहनधारक जखमी झाले आहेत. जलवाहिनी टाकल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने केवळ खडी टाकून 'मलमपट्टी' केली आहे, ज्यामुळे रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. ही खडी रस्त्यावर पसरल्यामुळे दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर चारचाकी वाहनांचेही अपघात होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाचे कारण देऊन प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. परतीचा पाऊस थांबून आठ दिवस उलटले तरी काम सुरू झालेले नाही. पाणीपुरवठा विभागाने खडी टाकून डांबरीकरण करणार असल्याचे सांगितले होते, पण ते केवळ आश्वासनच ठरले आहे. याशिवाय, नव्याने टाकलेली जलवाहिनी फुटून दुरुस्ती केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला काढलेला आणखी एक खड्डा धोकादायक बनला आहे. ​गणेशोत्सवाच्या आगमनापासून सुरू झालेली खड्ड्यांची ही समस्या आता दिवाळीतही कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, याच अपघातग्रस्त रस्त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी रोज ये-जा करतात, मात्र कोणीही या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. येत्या नगर परिषद निवडणुकीत प्रशासनाला धडा शिकवण्याचा इशारा देत, नागरिकांनी तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg