सावंतवाडी (प्रतिनिधी) - गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाचा अंत ठरलेलाच असतो. प्राणज्योत मालवल्यानंतर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. मात्र, या स्मशानभूमीत दिवाळीचा सण साजरा करणारा एक अवलिया गेल्या १२ वर्षांपासून सावंतवाडीत आहे. नात्यागोत्याचे नसले तरी, इथे आलेल्या मृतात्म्यांचे स्मरण करणारा हा अवलिया म्हणजे मारुती निरवडेकर. ते गेली १२ वर्षे सावंतवाडी नगरपरिषदच्या उपरलकर स्मशानभूमीत सेवा बजावत आहेत.
मारुती निरवडेकर हे दिवाळीचे पाचही दिवस पणत्या, आकाशदिव्यांसह स्मशानभूमीला विद्युत रोषणाई करून स्मशानातही दिवाळी सण साजरा करतात. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज आणि तुळशी विवाहापर्यंत ते नेमाने हे कार्य करतात. "मृत व्यक्तीचे स्मरण मी यानिमित्ताने करतो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून मी हे कार्य करतो," असे श्री. निरवडेकर आवर्जून सांगतात. मारुती निरवडेकर अहोरात्र उपरलकर स्मशानभूमीत कार्यरत असतात. मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. अग्नी देऊन नातेवाईक घरी गेल्यानंतर देखील मृतदेहाची राखण ते करतात. सारी भरण्यापासून ते दशक्रीया विधीपर्यंत त्यांची मदत दुःखात असलेल्या कुटुंबाला होते. यात त्यांना त्यांची सौभाग्यवती सौ. निरवडेकर या देखील सहकार्य करतात. स्मशानभूमीची देखभाल राखणे, स्वच्छता करणे, परिसरातील झाडांची निगा राखणे आदी कामेही ते करतात.
विशेष म्हणजे, कोरोनासारख्या महामारीत निर्बंधांमुळे रक्ताची माणसेही मुखाग्नी देऊ शकत नव्हती किंवा काहीजण ते धारिष्ट्यही दाखवत नव्हते. तेव्हा, हेच मारुती निरवडेकर त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत होते. त्यांच्या या निरपेक्ष आणि समर्पित कार्यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. आपल्या १२ वर्षांच्या सेवेतून मारुती निरवडेकर यांनी हे सिद्ध केले आहे की, मृत्यूच्या शांततेतही माणुसकी आणि आत्मिक शांतीचा दिवा तेवत ठेवता येतो.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.