म्हसळा - रायगड दीपावलीच्या मंगलमय शुभमुहूर्तावर म्हसळा तालुक्यात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण घडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ भव्य पुतळ्यासह शिवसृष्टी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम खासदार सुनिल तटकरे व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यामुळे म्हसळा नगरीत जणू शिवशाही अवतरल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले. ढोलताशांच्या निनादात, शिवप्रेमींच्या घोषणांत आणि रथयात्रेच्या थाटात संपूर्ण शहर एकत्र आले होते. जात, धर्म, पंथ, पक्ष विसरून हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून छत्रपती शिवरायांप्रती आपली निष्ठा व प्रेम व्यक्त केलं. शिवाजी महाराज हे जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहेत असे खासदार तटकरे, मंत्री आदिती तटकर या प्रसंगी म्हणाले, जगाच्या पाठीवर असा राजा शोधूनही सापडणार नाही, ज्याने कोणत्याही धर्माच्या किंवा वंशाच्या आधारे नव्हे, तर बारा बलुतेदारांच्या आधारावर रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांनी पुढे सांगितले की, शिवाजी महाराजांची शिकवण ही सर्वधर्म समभाव आणि लोकशाही मूल्यांची खरी प्रेरणा आहे.
शिवसृष्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची उजळणी होणार असून हे केंद्र भविष्यात एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसृष्टीचा पहिला टप्पा सुरू होत असताना या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी २.१५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुने तहसील कार्यालय उपलब्ध करून देत प्रशासनाने कमीत कमी वेळात ही प्रक्रिया यशस्वी केली. या जागेवर शिवाजी महाराजांचा अश्वरूढ भव्य पुतळा आणि त्यांच्या कार्याचा इतिहास अधोरेखित करणारी शिवसृष्टी उभारली जाणार आहे. कार्यक्रमात म्हसळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा आढावा देताना खासदार तटकरे यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. जानसई नदी संवर्धन व हिंगुलडोह पर्यटन विकास ४० कोटींची पाणी पुरवठा योजना, ग्रामीण रुग्णालय, शाळा, सामाजिक सभागृहांची उभारणी, सीसीटीव्ही प्रणाली, धावीरदेव मंदिर परिसरात नियमित शासकीय मानवंदना देण्यात येत असल्याचे सांगताना मंत्री आदिती तटकरे यांना, लोकांसाठी काम करण्याची संधी ही तिचे नशिबात आहे असे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले. संकटसमयी मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
त्यांनी म्हसळा तालुक्याच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांची मांदियाळी या ऐतिहासिक सोहळ्यास जिल्हाधिकारी रायगड, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, पोलीस निरीक्षक संदीप कहाले, नगराध्यक्षा फरहीन बशारत, समीर बनकर, महादेव पाटील, नाझीम हसवारे, नंदू गोविलकर, नाझीम चोगले, बबन मनवे, संजय कर्णिक, तसेच हिंदू-मुस्लिम समाजाचे नेते, भाजप-शिवसेना पदाधिकारी, सर्व नगरसेवक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला दिघी नाका ते धावीरदेव मंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात पार पडलेली रथयात्रा हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ऐतिहासिकतेला एक नवा आयाम दिला. शिवसृष्टीमुळे हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून हे केंद्र इतिहास, पर्यटन आणि प्रेरणा यांचा संगम ठरेल. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित विकास हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. म्हसळा येथे साकारली जाणारी शिवसृष्टी ही केवळ एक स्मारक न राहता भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आणि संपूर्ण कोकणासाठी अभिमानाचा विषय ठरणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.