loader
Breaking News
Breaking News
Foto

सनई वादनात संदेश मुरुडकर यांचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक विक्रम

खेड (दिलीप देवळेकर) - कोकणची लोकप्रिय पारंपरिक लोककला ‘खालू बाजा’ (आगरी-कोळ्यांचा सन्मान असलेला टिमकी बाजा) आज मुंबई शहरातून नष्ट होण्याच्या मार्गावर असताना, तिला पुनरुज्जीवित करून प्रतिष्ठित दर्जा मिळवून देण्याचे महान कार्य दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध सनई वादक संदेश मुरुडकर आणि त्यांचे लहान भाऊ आंतरराष्ट्रीय शिट्टी वादक रुपेश मुरुडकर यांनी केले आहे. आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सनई वादनाने या कलेला ऐतिहासिक वळण देत संदेश मुरुडकर यांनी सलग सनई वादन करून प्रतिष्ठेच्या 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. संदेश मुरुडकर यांच्या या अद्वितीय कामगिरीचे आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचे सध्या संपूर्ण भारतातून विशेष कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईसारख्या महानगरात ही पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी धाकटे बंधू रुपेश मुरुडकर यांनी मोलाचे योगदान दिले असून, हे पथक सुरू करण्यासाठी त्यांनी सन २००० मध्ये पुढाकार घेतला होता. गेल्या २५ वर्षांत अनेक संकटे, अडचणी आणि संघर्षावर मात करत मुरुडकर बंधूंनी आपल्या वाडवडिलांची ही कला जिवापाड जपत जिवंत ठेवली आहे. त्यांचे 'त्रिमूर्ती संदेश खालू बाजा आणि नृत्य पथक' हे मुंबईत शासकीय स्तरावर नोंदणीकृत असून, या पथकाने लोककलेला एका सन्माननीय स्तरावर नेऊन ठेवले आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार यांनी संदेश मुरुडकर यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव केला. पारंपरिक लोककला जोपासल्याबद्दल त्यांनी संदेश मुरुडकर यांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी मुंबई भाजपचे सचिव जितेंद्र राऊत, वॉर्ड अध्यक्ष प्रसाद जाधव, समाजसेविका लता सुभाष पालवणकर, मंगेश आंबोकर आणि रुपेश मुरुडकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या पथकाला मुंबईत २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ५ एप्रिल २०२६ रोजी रौप्य महोत्सवी वर्षाचा शानदार सोहळा सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. 'खालू बाजा' या लोककलेला शासकीय मेळाव्यांमध्ये हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी मुरुडकर बंधूंचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असून, कोकणी संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपणाऱ्या संदेश मुरुडकर यांच्यावर सध्या सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg