loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलादपूरच्या डोंगरदऱ्यांतील मराठी शाळांना घरघर; ३६ शाळांना लागली टाळी

पोलादपूर (धनराज गोपाळ) - निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि डोंगरदऱ्यांनी नटलेला पोलादपूर तालुका आज एका गंभीर शैक्षणिक संकटाचा सामना करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तब्बल ३६ मराठी शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. एकेकाळी मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या या शाळा आता ओस पडल्या असून, ही परिस्थिती तालुक्याच्या भविष्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गाव-वाड्यांमधील शैक्षणिक वारसा संकटात बंद पडलेल्या शाळांमध्ये प्रामुख्याने जलाचीवाडी, सावरीचीवाडी, महालगूर, आड, तामसडे, मोरेवाडी, येरंडवाडी, कोकबीचीवाडी यांसह इतर अनेक दुर्गम गावांतील शाळांचा समावेश आहे. मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा कणा असलेल्या या शाळा बंद होणे, हे ग्रामीण भागाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे लक्षण मानले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दुरवस्थेमागे रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने कारणीभूत आहे. तालुक्यात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी मुंबई-पुणे यांसारख्या शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाली आहे. परिणामी, गावात केवळ वृद्ध मंडळी उरली असून लहान मुलांची संख्या घटल्याने शाळांची पटसंख्या रोडावली आहे. एकीकडे सरकारी आणि मराठी शाळा बंद पडत असताना, त्याचाच फायदा घेऊन ग्रामीण भागात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक येऊ लागले आहे. शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या या 'दुकानां'मुळे गरीब पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे. मराठी शाळांकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात आपल्या मातृभाषेसाठी आणि ग्रामीण संस्कृतीसाठी घातक ठरू शकते.

टाईम्स स्पेशल

आपल्याच मातीतल्या मराठी शाळा आपण का वाचवू शकत नाही? स्थलांतर रोखण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासन ठोस पावले कधी उचलणार? इंग्रजीच्या अट्टाहासापायी आपण आपल्या मुलांचे मूळ आणि संस्कार तर गमावत नाही ना? अशी एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पोलादपूर तालुक्यातील ही स्थिती केवळ एका तालुक्याची नसून, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रासाठी हा धोक्याचा इशारा आहे. जर आताच यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर येणाऱ्या काळात कोकणातील अनेक गावे केवळ 'नावापुरती' उरतील आणि शाळांची जागा कायमची कुलपे घेतील. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg