loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली नगरपंचायतीची हद्द वाढविण्याबाबतचे ना.योगेश कदम यांचे स्पष्ट संकेत

दापोली (वार्ताहर) : कोकणातील वेगाने विकसित होत असलेल्या पर्यटन केंद्रांपैकी एक असलेल्या दापोली शहराच्या संभाव्य हद्दवाढीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. पर्यटन व्यवसायातील झपाट्याने होणारी वाढ, शहरालगतच्या भागांमध्ये वेगाने वाढणारे नागरीकरण आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेता दापोली नगरपंचायतीची हद्द वाढविण्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नाम. योगेश कदम यांनी दिले आहेत. दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील एका सार्वजनिक कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही वर्षांत दापोली तालुका पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे पुढे आला आहे. समुद्रकिनारे, नैसर्गिक सौंदर्य आणि वाढत्या होमस्टे-रिसॉर्ट संस्कृतीमुळे येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असली तरी शहराच्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरालगतच्या अनेक गावांमध्ये पर्यटन व्यवसाय, होमस्टे, रिसॉर्ट तसेच निवासी प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. मात्र या भागांमध्ये नियोजनबद्ध नागरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भविष्यातील विकासासाठी अधिक सुसूत्र नियोजनाची गरज अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शहरालगतच्या काही वाड्या-वस्त्या किंवा गावांचा समावेश नगरपंचायतीच्या हद्दीत करण्याबाबतचा मुद्दा शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती यावेळी नाम. कदम यांनी दिली. शहराच्या हद्दवाढीचा हा विचार प्रत्यक्षात उतरला तर, शहराच्या विकास आराखड्या अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया तसेच पर्यटनाशी संबंधित मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उभारणे शक्य होणार आहे. विशेषतः पर्यटन केंद्र म्हणून दापोलीची वाढ लक्षात घेता नियोजनबद्ध नागरी विकास ही काळाची गरज असल्याचे मत देखील नाम. कदम यांनी व्यक्त केलंय. याशिवाय पर्यटन, शिक्षण आणि सेवा क्षेत्रातील वाढ लक्षात घेता दापोली पुढील काही वर्षांत कोकणातील एक महत्त्वाचे नागरी केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

टाइम्स स्पेशल

शहरालगतच्या भागांमध्ये वेगाने वाढणारी बांधकामे आणि पर्यटन प्रकल्प यामुळे अनियोजित नागरीकरणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हद्दवाढ झाल्यास या भागांचा समावेश अधिकृत विकास आराखड्यात होऊन नियोजनबद्ध विकासाला गती मिळू शकते. ज्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया तसेच पर्यटनाशी संबंधित सार्वजनिक सुविधांच्या दर्जात सुधारणा आणि अनियोजित नागरिकरणावर नियंत्रण मिळवण्यास हद्दवाढ महत्त्वाची ठरू शकते, असे नाम. योगेश कदम यांनी सांगितले. लोकसंख्या, आर्थिक क्रियाशीलता आणि शहराचा विस्तार वाढत राहिल्यास भविष्यात दापोली नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता देखील यावेळी नाम. कदम यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg