सावंतवाडी (प्रतिनिधी) - औद्योगिकीकरणाच्या नावाखाली निसर्गसंपन्न ग्रामीण भागाचा बळी दिला जात असल्याचा प्रकार सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथे समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या दगड खाण (क्वारी) आणि क्रशर उद्योगामुळे ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले असून, याविरोधात मंगळवारी शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला. या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मंडळ अधिकारी यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित प्रकल्प बंद ठेवण्याचे कडक आदेश दिले आहेत. विलवडे परिसरात सुरू असलेल्या या क्वारीमध्ये नियमांचे उल्लंघन करून दिवसासोबतच रात्रीच्या वेळीही भीषण स्फोट घडवून आणले जात आहेत. या स्फोटांच्या तीव्रतेमुळे संपूर्ण गाव हादरत असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. रात्रीच्या शांततेत होणाऱ्या या आवाजामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण कमालीच्या दहशतीखाली आहेत. सततच्या आवाजामुळे अनेकांना उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावासारख्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.
क्रशरमधून उडणारी सूक्ष्म धूळ वाऱ्याच्या वेगाने थेट लोकवस्तीत शिरत आहे. यामुळे गावात खोकला, दमा आणि श्वसनाचे विकार बळावले आहेत. "आमच्या जीवाशी खेळून कसला विकास करता?" असा संतप्त सवाल यावेळी महिला आंदोलकांनी प्रशासनाला विचारला. केवळ मानवी आरोग्यच नव्हे, तर परिसरातील शेती आणि बागायतीवरही या धुळीचा विपरित परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. पंचायत समितीचे माजी उपसभापती कृष्णा सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० पेक्षा जास्त शेतकरी, ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी पाहणी दरम्यान या प्रकल्पाचे काम नियमानुसार सुरू नसल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले. तहसीलदारांनी बांदा मंडळ अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत हा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत दगड खाणीचे सर्व काम बंद ठेवण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.
क्रशर आणि क्वारीचे काम कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. आवाजाची मर्यादा आणि धुळीच्या प्रदूषणाची पर्यावरणीय तपासणी व्हावी. बाधित ग्रामस्थांना आरोग्यविषयक नुकसानभरपाई मिळावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर फौजदारी कारवाई व्हावी. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, रानमाणूस प्रसाद गावडे आणि ऋषिकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, जि.प. सदस्य नितीन राऊळ, प.स. सदस्य सदानंद राणे, सरपंच प्रकाश दळवी, विलास सावंत, संतोष दळवी, सुधीर सावंत, गुणेश गवस, आनंद दळवी, राजाराम दळवी, साईप्रसाद कल्याणकर,दीपक सावंत, संजय सावंत, गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर, गुरुदास गवंडे यांसह बांदा मंडळ अधिकारी यु.एन. पाटील, तलाठी केतन कांबळे आणि विलवडे, भालावल, मेरेखण वाडी (डेगवे) येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विलवडेवासीयांनी दिला आहे.

















































































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.