loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यातील दुकानाला मध्यरात्री भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

बांदा (प्रतिनिधी) - बांदा-गडगेवाडी भागातील ‘कल्पना ट्रेडर्स’ या हार्डवेअर दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून दुकानातील हार्डवेअर साहित्य व यंत्रसामग्रीसह मोठे नुकसान झाले आहे. तब्बल २५ वर्षांपासून बांदा शहरात कार्यरत असलेले हे दुकान काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ला येथून पाचारण करण्यात आलेले अग्निशमन दलाचे बंब तब्बल दोन तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने बांदा वासियांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर व ज्वाळा बाहेर येताना दिसल्या. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानाला आपल्या कवेत घेतले. दुकानात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील हार्डवेअर साहित्य असल्यामुळे आग अधिकच भडकली आणि काही वेळातच दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ला येथील अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे दोन तासांचा विलंब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी पहाटेपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर दीर्घ प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत दुकानातील हार्डवेअरचे साहित्य, यंत्रसामग्री व इतर माल जळून खाक झाला असून दुकानमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे बांदा व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg