loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाळ्यानंतरही मासळीची आवक मंदावली; पापलेट-बांगड्याचे दर कडाडले, मात्र सुरमई-सरंगा स्वस्त

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर आता दोन महिने उलटून गेले असले तरी, दापोलीच्या मासळी बाजारात मासळीची आवक अजूनही अपेक्षित प्रमाणात झालेली नाही. विशेषतः सामान्य खवय्यांच्या आवडीचे पापलेट आणि बांगडा हे मासे मच्छीमार नौकांना फारच कमी प्रमाणात मिळत असल्याने त्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट बिघडले आहे. याच्या उलट, इतर मच्छीमार नौकांना सुरमई आणि संरगा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने या दोन मासळीचे दर मात्र आवाक्यात आले असून मासेप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला आहे. मासेमारी बंदी उठल्यानंतर नौकांना पापलेट आणि बांगडा फारच कमी प्रमाणात मिळत आहेत. सध्या पापलेटचा एक किलोचा दर १२०० ते १३०० रुपयांदरम्यान स्थिर आहे, जो सर्वसामान्यांसाठी प्रचंड आहे. त्याहून विशेष म्हणजे सामान्य लोकांच्या रोजच्या आहारात असलेल्या बांगड्याचे दरही गगनाला भिडले आहेत. जो बांगडा पूर्वी ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत होता, तो आता १२० ते १५० रुपये किलो दराने विकला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बांगड्याचा पुरवठा कमी होण्यामागे ‘पर्ससीन नेट’ या मच्छीमार नौकांना होणारी कमी पकड हे मुख्य कारण आहे. या नौका मुख्यत्वे बांगडा आणि म्हाकूळ पकडतात. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरु झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात फक्त एका आठवड्यासाठी बांगड्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी मिरकरवाडा बंदरात बांगडा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला गेला. मात्र, आता ही मासळी फारच क्वचित वेळी चांगल्याप्रमाणात मिळत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. याउलट, पर्ससीन नेट मच्छीमार नौकांव्यतिरिक्त इतर फिशिंग नौकांना सध्या सरंगा आणि सुरमई मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यामुळे या मासळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मोठ्या सुरमईचा एक किलोचा दर आता ४०० ते ४५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. याच सुरमईचा दर गेल्या महिन्यात ६०० ते ७०० रुपये किलो दराने मिळत होता. त्याबरोबरच, ७०० ते ८०० दराने मिळणारा सरंगा मिरकरवाडा बंदरात सध्या ५०० रुपये किलो दराने विकला जात आहे. सौंदाळ्याचे दरही बऱ्यापैकी आवाक्यात आले असून मोठे सौंदाळे २०० ते २५० रुपये किलो दराने विकले जात आहेत. यामुळे पापलेट आणि बांगड्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असले तरी, सुरमई आणि सरंगा यांसारखे मासे स्वस्त दरात उपलब्ध झाल्यामुळे मासळी बाजारात सध्या संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg