loader
Breaking News
Breaking News
Foto

साखर गावच्या श्री कालिकामाता देवीचा वार्षिक भव्य यात्रौत्सव 2025

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील सह्याद्रिच्या कुशीत, स्वयंभू नागेश्वर आणि परशुरामाच्या पावन भूमीत वसलेले निसर्गरम्य साखर गाव, आणि या गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान, पंधरागावच्या ऐतिहासिक गादीचा वारसा असलेली आदीमाया आदीशक्ती श्री कालिकामाता देवीचा वार्षिक यात्रौत्सव चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी गुरूवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यावेळी सकाळी ठिक 8 वाजता गावातील बहूसंख्य ग्रामस्थ देवीच्या वार्षीक परंपरेनूसार माणकर्‍यांकडे जाऊन त्यांचे शुभहस्ते लाटेची विधीवत पुजा करून घेतात. आणि त्यानंतर देवीची लाट तोडून देवीच्या यात्रौत्सवास सुरवात करतात. दुपारी ठिक 11 वाजता माणकर्‍यांच्या वाडीतून गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात लाटेची मिरवणूक काढत मंदीर स्थळी आणतात व सायंकाळी ठिक 4 वाजता ढोल ताशांच्या गजरात लाट खरखांबावर चढवली जाते. सायंकाळी 6 वाजता पंचक्रोशीतील निमत्रित दैवतांचे आगमन परंपरेनुसार ठरल्याप्रमाणे गावचे तीन मानकरी चौकीचीवाडी, जांभूळवाडी व बामणवाडी या तीन वाड्यांमध्ये आगमन होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रत्येक वाडीतील मानकरी मंडळ यांचेतर्फे निमंत्रित देवतांचे भक्तिभावाने पुजन करून, महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि या दैवतांकडे वाडीतील भाविकांनी केलेले नवस फेडले जातात. दैवतांच्या पालखीसोबत आलेल्या सर्व खेळ्यांना महाप्रसाद दिला जातो त्यानंतर रात्री 8.30 वाजता सर्व निमंत्रित दैवतांच्या पालख्या यात्रेस्थळी येण्यास निघतात. तसेच सायंकाळी 7 वाजता देवीची महाआरती करून लाट फिरविण्याचा कार्यक्रम केला जातो. रात्री ठिक 9 वाजता परिसरातील देव दैवतांच्या पालख्यांचे आगमन व पालख्यांच्या गळाभेटीने स्वागत होते. सर्व पालख्यांच्या आगमनानंतर ढोलताशांच्या गजरात, सनईच्या मंगळ सुरात व फटाक्यांच्या आतषबाजीत निमंत्रित देवतांच्या मानाप्रमाणे पालख्या नाचवत मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालून मनमोहक, नयनरम्य छबिना काढला जातो. हा छबिना सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, गुहागर या तालूक्यांतील तसेच दुर-दुरवरून भाविक भक्तजन मोठ्या उत्साहाने येतात. गणेश पुराणांमध्ये सर्व वार्षिक तिथींची माहिती दिली आहे. त्यामध्ये चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी ही सर्व श्रेष्ठ तिथी असून ती सर्व तिथींची माता आहे. असा उल्लेख आहे. अशा या सर्व श्रेष्ठ तिथीला साखर गावचे आराध्य दैवत श्री कालिकामातेची यात्रा होते. हे देवीचे महात्मे आहे. यामुळे पंधरागावात साखर गावचे महत्व आहे. आई कालिकामाता नवसाला पावणारी आणि एक जागृत देवी म्हणून प्रसिद्ध आहे. नुकतेच देवीचे हेमांडपंथीय सुंदर कलाकृती, नक्षीकाम केलेले पाषाणी मंदिर बांधले आहे. विशेष या मंदिराचे प्रवेशद्वार हे येणार्र्‍या भाविकांचे लक्ष आकर्षित करते.

टाईम्स स्पेशल

शुक्रवार दि. 18 एप्रिल 2025 रोजी, चैत्र कृष्ण पंचमीला देवीचा सभा होणार आहे. त्यामध्ये तीन वाडीतील मानकरी यांचेहस्ते गावचे ग्रामदैवत श्री कालिकामाता आणि श्री झोलाई माता तळवट जावळी यांचे मध्ये एक चौक भरून त्याचे मानकर्‍यांकडून पुजन केले जाते. आणि झोलाई माता देवीची खणा नारळाने ओटी भरून ओटीचा प्रथम मान दिला जातो. त्यानंतर सर्व निमंत्रित देवतांना ओटीचा मान देण्यात येतात. यास्थळी गळ लावण्याची परंपरा आसल्याने परंपरेनुसार मानकर्‍यांचे हस्ते गळाची पुजा केली जाते आणि तो गळ आणि लाट खरखांभा सभोवताली फिरविले जाते. लाटेची दिशा चढवतेवेळी दक्षिण-उत्तर असते ती पश्चिम-पुर्व दिशेला करून ठेवण्यात येते. यानंतर निमंत्रित मंदिरातील सर्व देवतांच्या पालख्या पाठवणीसाठी एक-एक करून बाहेर काढून तसेच यांचे समवेत आई कालिका मातेची पालखी बाहेर काढून या सर्व देवतांना ढोल ताशांच्या गजरात सन्मानाने सोडण्यात येते आणि अशा प्रकारे यात्रौत्सव पूर्णत्वास जातो. यात्रेचा मनमोहक, नयनरम्य छबिना सोहळा आणि सौ. छाया आगर नागजकर यांचा सांगली जिल्ह्यातील सुप्रसिध्द लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी सहकुटूंब, सहपरिवार, मित्रमंडळीसह उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि यात्रौत्सवाचा आनंद व्दिगुणित करावा असे आग्रहाचे निमंत्रण समस्त साखर गाव ग्रामस्थ कमिटी आणि ग्रामीण, मुंबई, पुणे ग्रामस्थ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg