वैभववाडी (संजय शेळके) - गावपळणीची परंपरा जपणार्या शिराळे गावच्या गावपळणीला बुधवारी सुरुवात झाली. गावपळणी दरम्यान प्रशासन ही सहभागी होऊन गावातील प्राथमिक शाळा ही झोपडी लगतच्या आंब्याच्या झाडाखाली भरते तर गावात जाणार्या एसटी बस झोपडी जवळून परत माघारी फिरतात. एसटी सुद्धा गावात जात नाही. ४५० वर्षांची परंपरा जपणार्या शिराळेवासीयांच्या गावपळणीत प्रशासन सुद्धा सहभागी झालेले असते. या गावपळणीमध्ये आठ महिन्याच्या बालकासह वयोवृद्ध सुद्धा सहभागी झालेले आहेत. शिराळेवासीयांनी नववर्षाचे स्वागत गावाच्या बाहेर धोंडोबा डोंगराच्या पायथ्याशी झोपडीमध्ये काळोख्या अंधारात केले. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एकमेव दरवर्षी गावपळण करणारे शिराळे गाव गेले अनेक वर्ष हा गाव नित्यनेमाने आपल्या गांगो देवाचे वार्षिक म्हणून दरवर्षी गावपळण करत असते. तरी सुद्धा शिराळेवासीय वास्तव्य करतात त्या ठिकाणी प्रशासनाने आजपर्यंत कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. पाणी, लाईट इत्यादी.. त्यामुळे ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली. आम्ही प्रशासनाकडे दरवर्षी मागणी करत असतो असे ग्रामस्थांनी सांगितले. सध्या पौष महिना सुरू असून थंडीचा कडाका वाढला आहे, अशा परिस्थितीतही शिराळेवासी आपल्या श्रद्धेपोटी घरादाराचा त्याग करून निसर्गाच्या सानिध्यात उघड्या माळरानावर राहत आहेत.
वैभववाडी तालुक्यातील शिराळे गाव वैभववाडी बाजारपेठेपासून सुमारे १५ किलोमीटर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या गावातील जागृत देवस्थान असलेल्या गांगेश्वर देवाच्या हुकूमाने ही गावपळण होते. रविवारी गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेऊन ग्रामस्थांनी दोंडोबाच्या उघड्या माळरानावर झोपड्या बांधून गाव सोडून राहण्यासाठी दाखल झाले. शिराळेवासीय गावपळणी दरम्यान लागणारा धान्यसाठा, जनावरे, पक्षी या सर्व गोष्टी घेऊन गावाबाहेर जातात व सडूरे गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे दडोबाच्या पायथ्याशी उघड्या माळरानामध्ये झोपडी बांधून वास्तव करत आहेत. गावपळणी दरम्यान शिराळेवासिय दिवसभर आपली गुरेढोरे माळरानावर सोडून चरणीचे काम करतात तर रात्री शेकोट्या पेटवून सर्वजण मज्जा मस्करी करत बसलेले असतात. गावपळणी दरम्यान लगत असणार्या सुख नदीमध्ये झरा खोदून पाणी पितात. २५ ते २७ झोपड्या असून एकमेकांच्या झोपडीला झोपड्या लागून बांधलेल्या आहेत त्यामुळे दिवस रात्र हे सर्व लोक एकत्र राहतात.
गावपळण केल्यानंतर पहिले तीन दिवस कुणीही गावात पाऊल ठेवत नाही कारण या तीन दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे तीन दिवस गावात कोणाचाही आवाज होता कामा नये. त्यामुळे पहिले तीन दिवस कोणीही गावात जात नाही. तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर दिवसा ग्रामस्थ गावात जाऊन आपले घरदार पाहून येतात पण गावात राहत नाहीत. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो त्यानंतर गावभरणी होते. एकूण गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात. शिराळेवासीयांचा आपल्या गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात परत तीन दिवसानंतर हुकूम घेऊन गावात परततात. शिराळे गाव सडूरे गावचा महसुली गाव असून सडूरे शिराळे ग्रुप ग्रामपंचायत आहे. शिराळे गावात ७५ कुटुंब असून सुमारे ३४० लोकसंख्येचा असणारा गाव आहे. या गावपळणीला तालुक्यासह जिल्ह्यातील शिराळेवासियाचे पै पाहुणे मित्रमंडळी तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने भेट देऊन सहभागी होतात.


























































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.