loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण स्मार्ट सिटी करतानाच नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबवणार : उमेश सकपाळ

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण स्मार्ट सिटी करणार आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रत्येक प्रभागात ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणार असून त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मार्गी लावू. नगराध्यक्षांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रभाग समिती स्थापन करून जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आश्वस्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सोमवारी दुपारी पदग्रहण केले, यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या ओझरवाडीतील कार्यालयाबाहेर सकाळपासून डीजे वाजविण्यात येत होता. दुपारी रॅलीने ते नगर परिषदेत आले. प्रथम बहादूरशेख नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आली असता तेथे शिवपुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. पुढे चिंचनाका मार्गे रॅली नगर परिषदेजवळ पोहोचली असता जोरदार घोषणा देण्यात आल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगराधक्ष सकपाळ यांनी पदग्रहण केले. यावेळी शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपचे नेते, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते व निवडणूक प्रभारी प्रशांत यादव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, तालुकाप्रमुख संदेश आयरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, नगरसेवक शशिकांत मोदी, रसिका देवळेकर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

नगराध्यक्ष सकपाळ व सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देताना नगर परिषदेत सेना- भाजप युतीचा नगराध्यक्ष व सर्व सत्ता आली आहे. जनतेला विश्वासात घेऊन विकासकामे मार्गी लावू व विकासाची दारे खुली करू, असे सेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी सांगितले. नगराध्यक्षांना एकाचवेळी कामे सांगू नका किंवा एकाचवेळी उपदेशाचे डोस देऊ नका ते पचनी पडणार नाहीत. तर वेळोवेळी त्यांच्याशी समन्वय साधून, चर्चा करून विकासकामे करून घ्या. या शहराचा विकास आपल्याला युती म्हणून करायचा आहे, असे डॉ. विनय नातू यांनी सांगितले. नगर परिषद निवडणुकीत सर्वांनी भरघोस सहकार्य केल्यामुळे शिवसेना- भाजप युतीला चांगले यश मिळाले व आपली सत्ता आली. आता शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक तो निधी आणून दर्जेदार कामे केली जातील. या शहराच्या सौंदर्यात भर घालून नागरिकांना दिलासा दिला जाईल. म्हणजे भविष्यात युतीला मतं मागायला जायलाच नको. लोकच आपल्याला निवडून देतील, असा विश्वास प्रशांत यादव यांनी व्यक्त केला. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg