loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशल मीडियातून लोककलेचा जागर, तरुणाई बनतेय वारसदार

देवळे ( प्रकाश चाळके) - सोशल मीडियाच्या दुनियेत अधिक रमलेली तरुण पिढी लोककलेपासून दूर गेली आहे, असे एकेकाळी बोलले जात होते. मात्र, सध्याचे चित्र याला छेद देणारे आहे. लोककलेचे सादरीकरण, अभ्यास आणि जतन यामध्ये आजची तरुणाई अग्रेसर होताना दिसत आहे. राज्यभर ठिकठिकाणी तरुण कलावंतांचे लोककलेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात असून, या कार्यक्रमांना केवळ शहरी भागातूनच नव्हे, तर ग्रामीण भागातूनही मोठी मागणी वाढताना दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण, पुणे, मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये लोककलेच्या कार्यक्रमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून अनेक कार्यक्रम हाऊसफुल्ल होत आहेत. विशेष म्हणजे तरुण लोककलावंतांनी सादर केलेल्या लोककलांची रील्स सध्या इन्स्टाग्राम व फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. शाहिरी, नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, भारूड, पोवाडे, जागरण-गोंधळ, महाराष्ट्राची लोकधारा, कोकणचे खेळे अशा विविध लोककला पूर्वी यात्रा-जत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सादर व्हायच्या. ज्येष्ठ कलावंतांनी या अस्सल लोककलेची परंपरा जपली आणि वाढवली. मात्र, काही काळानंतर ही लोककला लोप पावत चालली असल्याची भावना व्यक्त केली जात होती. आता मात्र लोककलेच्या क्षेत्रात तरुण कलावंतांची संख्या वाढत असून फोक अख्यान, फोकलोक, लोकगीते आणि लोकवाद्यांवर आधारित कार्यक्रमांनी मराठी रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली आहे. लोकगीतांचे गायन आणि लोकवाद्यांचे वादन यामधून लोककलेचा इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे. कार्यक्रमांमध्ये तरुण कलावंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि मोठ्या ऊर्जेने सादरीकरण करत असून २० ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी या लोककला चळवळीत सक्रिय झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

महाविद्यालयीन तरुणाईपासून आयटी क्षेत्रातील नोकरदार, डॉक्टर, वकील, शिक्षक, बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी अशा विविध क्षेत्रांतील तरुण लोककलेचे कार्यक्रम सादर करत आहेत. केवळ प्रत्यक्ष कार्यक्रमच नव्हे, तर सोशल मीडियावरही लोकवाद्यांवरील रील्स, जागरण-गोंधळ, नमन, जाखडी ते कीर्तन अशा लोककलेच्या प्रकारांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत असून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी मातीतील लोककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न तरुण लोककलावंत विविध माध्यमांतून करत आहेत. याविषयी तरुण लोककलावंत शाहीर जितेंद्र महाडिक म्हणाले, “मी गेल्या काही वर्षांपासून लोककलेचे कार्यक्रम सादर करीत आहे. गण, गवळण, बतावणी, भारूड, भजन यांसह लोप पावत चाललेली ‘पिंगळा’ ही लोककलाही मी सादर करतो. लोककलेचा वारसा जपण्याचे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सादरीकरणातून सुरू आहे.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg