सावंतवाडी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात सध्या पाच ते सहा हत्तींचा वावर असून, त्यांच्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नावर वन विभागाने तातडीने पावले उचलावीत, असे कडक निर्देश माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिले. हत्तींच्या प्रश्नावर वन विभाग केवळ आश्वासने देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून, याप्रकरणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तातडीने बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वन विभागाला धारेवर धरले. तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, "ओंकार हत्तीला पकडण्याचे आदेश असतानाही वन विभागाने दिरंगाई केली, ज्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने दिलेल्या निकालावर वन विभागाने वरच्या न्यायालयात अपील का केले नाही? जर वन विभागाला अडचण असेल तर सांगा, आम्ही शेतकरी स्वतः अपील करू."
हत्तींच्या समस्येसाठी स्वतंत्र वनक्षेत्रपाल, वनपाल आणि गार्डची यंत्रणा निर्माण करावी.हत्तींना मानवी वस्तीतून हटवून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) नेण्यासाठी ठोस कृती आराखडा हवा. जंगलातच वन्यप्राण्यांसाठी खाद्य आणि पाण्याची सोय (तलाव, बंधारे) करावी, जेणेकरून ते वस्तीत येणार नाहीत. माकड आणि शेकरू यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई वेळेवर मिळावी. बैठकीत बाबाजी देसाई यांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की, "वन विभागाने ओंकार हत्तीला नंदीबैल करून ठेवले आहे, त्याला गावात न फिरवता थेट जंगलात न्या." तर राजू निंबाळकर यांनी गेल्या २२ वर्षांपासून हत्तींचा प्रश्न प्रलंबित असून वन विभाग केवळ 'प्रायोगिक' गप्पा मारत असल्याची टीका केली. विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांनी इशारा दिला की, जर शेतकऱ्यांची फसवणूक थांबली नाही, तर यापुढे वन अधिकाऱ्यांना गावात उभे करून घेतले जाणार नाही.
सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांनी यावर स्पष्टीकरण दिले की, ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तसेच, कोल्हापूर येथील घाटकरवाडी येथे हत्ती कॅम्प तयार करण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. वन्यप्राण्यांच्या नुकसान भरपाईत वाढ करण्याबाबतचा प्रस्तावही शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभवडे ते खडपडे रस्त्यावरून वीज वितरण कंपनीच्या वतीने पोल उभारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वीजय गावडे यांनी केली. या बैठकीला शैलेश दळवी, विजय गावडे, गोपाळ गवस, राजेंद्र गवस, रामदास मेस्त्री, झोळंबे सरपंच विशाखा गवस, कुडासे सरपंच पुजा देसाई, हेवाळे उपसरपंच समिर देसाई, फुकेरी सरपंच निलेश आईर, सरपंच अनिल शेटकर, नंदू टोपले, सुनील गवस, भगवान गवस यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. हत्तींचा मार्ग कायमचा बंद करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता वनमंत्री स्तरावर बैठक घेऊन निर्णय घ्या अशी मागणी करण्यात आली.






























































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.