पनवेल (जितेंद्र गावडे) - पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती झाल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उपस्थित राहून निवडणूक रणनीती आणि आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली. ७८ जागांपैकी ७१ भाजप, ०४ शिवसेना, ०२ राष्ट्रवादी काँग्रेस तर ०१ जागा आरपीआय असा फॉर्म्युला यावेळी जाहीर झाला. शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी व महायुतीच्या नेत्यांनी हि घोषणा केली. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेत मोठा विजय मिळवत महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास महायुतीच्या नेते मंडळींनी व्यक्त केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे नेते शिवदास कांबळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, आरपीआयचे महानगर अध्यक्ष प्रभाकर कांबळे, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू आदी उपस्थित होते.
यावेळी महायुतीची घोषणा करताना पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेत स्थिर व सक्षम प्रशासन देण्यासाठी महायुती एकत्र आली असून, विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले. शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि पारदर्शक कारभार हे महायुतीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी महायुतीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल आणि पनवेल महानगरपालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन होईल. मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे सर्वसामान्य माणसाच्या विकासाचे सरकार आहे. महापालिकेत विकासाचे धोरण आणि विकासाचे तोरण या दृष्टिकोनातून महायुती सज्ज झाली असून १६ जानेवारीला महायुतीचा विजय मोठा असेल असे आमदार महेश बालदी म्हणाले. पनवेल महापालिका प्रचंड विकासाची क्षमता असलेली महापालिका म्हणून नावारूपाला आली आहे. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात विकास आला आहे या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र, राज्याप्रमाणे महापालिकेतही महायुतीची सत्ता आली पाहिजे. लोकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम करण्यात आले आहे. लवकरच जाहीरनामा जाहीर करून लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
निवडणुकीत जागांपेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचे काम केले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले आता महापालिका जिंकायची आहे. वाटाघाटीच्या अनुषंगाने आम्ही समाधानी असून पुन्हा एकदा महापालिका जिंकण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे म्हणाले. कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे हि भूमिका राहिली आहे. महायुती म्हणून आम्ही समाधानी आहोत आणि भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जात महायुतीची सत्ता येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे यांनी बोलून दाखवला. मागील वेळी आरपीआयचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. यावेळीही आम्हाला सत्तेत सहभागी करून घेतले आहे त्यामुळे आम्ही समाधानी असून महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.