loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळुणात वाशिष्ठी कृषी महोत्सव व पशुधन प्रदर्शनाला ५ जानेवारी पासून सुरुवात

चिपळूण (गजेंद्र खडपे) : कोकणच्या जडणघडणमधील सांस्कृतिक वैभव टिकावे, ते जोपासले जावे याशिवाय पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कोकणातील शेतकरी समृद्ध-सक्षम व्हावा, यासाठी त्यांना अधिक बळ देण्याचे काम 'वाशिष्ठी'च्या कृषी महोत्सव व पशुधन प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही करतोय. आपण सर्वांनी याला पाठबळ देऊन सहकार्य करावे, असे आवाहन या महोत्सवाचे प्रमुख आयोजक आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे. चिपळूणमध्ये बहादुरशेख नाका येथील सावरकर मैदानात दिनांक पाच ते नऊ जानेवारी या कालावधीत 'वाशिष्ठी डेअरी'मार्फत सलग तिसऱ्या वर्षी भव्य-दिव्य वाशिष्ठी कृषी महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. 'महोत्सव कोकणाचा, कृषी समृद्धीचा' हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमाचे उद्घाटन कधी होणार? पाच दिवस कोणकोणते कार्यक्रम होणार? महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट काय? याची सविस्तर माहिती वाशिष्ठी डेअरीचे सर्वसर्वा यादव यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतीपूरक व्यवसायात कोकणातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, पारंपरिक शेतीसोबतचं त्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, इतर ठिकाणचे शेतकरी फक्त शेती व्यवसायावर कसे प्रगत झाले याबाबत विस्तृत मार्गदर्शन या महोत्सवातून केले जाणार आहे. कोकणातील शेतकऱ्याला उर्जितावस्था देणे हेच या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यादव म्हणाले. यानिमित्ताने सलग पाच दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. पाच जानेवारी रोजी रक्तदान शिबीर, शेती आणि दुग्ध व्यवसायमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, कोकणातील पारंपरिक वाद्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, सहा तारखेला शेती विषयक तज्ञांची व्याख्याने यासोबतच वर्षभरात जास्त प्रमाणात दुध व दुभते देणाऱ्या गायी-म्हशीच्या स्पर्धा, सात तारखेला मूळव्याध आणि पोटाचे विकार यावर आरोग्य शिबीर, डॉग आणि कॅट शो, रात्री आठ वाजता मुंबईतील हेमंत बेडेकर यांचे बांबू लागवडीवरील व्याख्यान व त्यानंतर स्वराज्यरक्षक मावळे हा शिवशाहीवरील आधारित कार्यक्रम होईल. आठ तारखेला गोड पदार्थांची पाककला स्पर्धा आणि मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार, गायक अवधून गुप्ते यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर नऊ तारखेला तिखट पदार्थांची पाककला स्पर्धा होईल. तर कार्यक्रमाची सांगता स्व. अभिनेते राज कपूर यांच्या जन्म शताब्दीनिमित्ताने सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या 'आवारा हूं' या अशोक हांडे दिगदर्शित कार्यक्रमाने होणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

या महोत्सवाच्या निमित्ताने बैलगाडा स्पर्धेतील प्रमुख आकर्षण असलेला, हिंदकेसरी बकासुर बैल चिपळूणमध्ये येणार आहे. पाच तारखेला दिवसभर तो कार्यक्रमस्थळी असेल. याशिवाय 'घोटचा सर्जा' आणि 'निंबाळकरांचा सर्जा' हे दोन्ही बैल याठिकाणी भेट देणार आहेत. या महोत्सवाचे ते प्रमुख आकर्षण असणार आहेत. यापुढील काळात कोकणला अभिप्रेत असलेली शेती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कशा पद्धतीने करायची याचे लाईव्ह डेमो याठिकाणी शेतकऱ्यांना दाखविले जाणार आहेत. हेसुद्धा महोत्सवचे वेगळे आकर्षण ठरेल. यासाठी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरीतील पशुवैद्यकीय, कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे यादव यांनी सांगितले. याशिवाय खेकडा पालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन असे शेतीपूरक व्यवसायांचे लाइव्ह डेमो सुध्दा महोत्सवमध्ये पाहता येणार आहेत. पाच तारखेला या महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, मस्य आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, पालकमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या सह जिल्ह्यातील आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोकणातील शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या महोत्सवाचा मूळ हेतू आहे. याचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत यादव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg