loader
Breaking News
Breaking News
Foto

साहित्य हे देश घडवणारे आणि बिघडलेले दुरुस्त करणारे असते; कवयित्री नीरजा यांचे प्रतिपादन

सावंतवाडी (प्रतिनिधी): "साहित्य हे नेहमी दूरदृष्टी ठेवून लिहिले जाते. ते केवळ समाजाचा आरसा नसते, तर देश घडवणारे आणि बिघडलेले पुन्हा दुरुस्त करणारे असते. आजच्या काळात वैचारिक कत्तल रोखण्यासाठी विचार करायला लावणारी साहित्य संमेलने होणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी केले. ​महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून आणि श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन यांच्या वतीने आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नीरजा भूषवत होत्या. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या नवरंग मंचावर या संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन झाले. ​आपल्या भाषणात नीरजा यांनी सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीवर भाष्य करताना तपोवनातील झाडांच्या कत्तलीचा निषेध केला. त्या म्हणाल्या, "ज्या काळात आयआयटी सारख्या संस्थांमध्ये पुरोहित तयार करण्याचे अभ्यासक्रम सुरू होतात, त्याच काळात झाडांची, ज्ञानाची आणि विवेकाची कत्तल सुरू होते. इतिहासाची मोडतोड करून सत्ताधारी संकुचित वृत्तीने वागत आहेत. अशा काळात नव्या साहित्यिकांनी मुक्त भाषेचा आविष्कार घडवत आत्मशोध घेणारे साहित्य निर्माण केले पाहिजे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा दर्जा केवळ संस्कृतप्रचुर मराठीला मिळालेला नाही, तर तो सातवाहनांच्या काळातील प्राकृत, गाथा सप्तशतीमधील लोकभाषा आणि गेल्या हजार वर्षांतील संत परंपरेने समृद्ध केलेल्या बहुजनांच्या भाषेला मिळाला आहे. "ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांच्या भाषेतूनच ज्ञानेश्वरी सांगितली. ही भाषा टिकवण्यासाठी पहिलीपासून मराठी शिक्षण अनिवार्य हवे," असेही त्यांनी ठामपणे मांडले. ​मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. "ज्याप्रमाणे 'मराठी भाषा भवन' उभारले जात आहे, त्याच धर्तीवर शासनाने 'अनुवाद अकादमी' सुरू करावी. भारतीय भाषांमधील साहित्याचा एकमेकांत अनुवाद झाला, तरच खऱ्या अर्थाने भाषांचा पूल बांधला जाईल आणि भारतीय साहित्याची अभिरुची वाढेल," असे नीरजा यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

कोकणातील साहित्यिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली असल्याचे सांगत त्यांनी वि. स. खांडेकर, चि. त्र. खानोलकर, मंगेश पाडगावकर, केशवसुत, मधु मंगेश कर्णिक, वसंत सावंत, चंद्रकांत खोत, जयंत पवार आणि प्रवीण बांदेकर यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. धर्माच्या नावावर भिंती उभ्या करणाऱ्यांच्या विरोधात साहित्यिकांनी भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. ​या सोहळ्याला माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले, प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर, स्वागताध्यक्ष लेखक प्रवीण बांदेकर, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, शेखर सामंत, सहाय्यक शिक्षण उपसंचालक गणपती कमळकर, रमेश बोंद्रे, भरत गावडे, विठ्ठल कदम, अँड संदीप निंबाळकर, प्रा अरूण पणदूरकर, डॉ शरयु आसोलकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रमेश बोंद्रे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg