loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना- भाजप युतीत मोठा पेच, निलेश राणे फॉर्म्युला कोंडी फोडणार?

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेना- भाजप युती होईल की नाही हे सांगता येत नसले तरी कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक ही युती म्हणूनच लढण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी या दोन पक्षांची युती झाल्याचे जाहीर झाले आहे. महायुतीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) स्वबळावर लढतो आहे. २२७ जागांच्या वाटपावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार खेचाखेची पहायला मिळत आहे. चर्चेच्या अनेक फेर्‍या पार पडल्या तरी जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप शिवसेनेला १०० जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे ही कोंडी फुटताना दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दि. ३० डिसेंबर दु. ३ वाजेपर्यंत मुदत आहे. मात्र अजूनही जागा वाटप निश्‍चित झालेले नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम आणि शिवसेनेचे उपनेते ना. उदय सामंत यांनी झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना सांगितले की, २२७ पैकी २०७ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. २० जागांचा निर्णय बाकी आहे. किती जागांवर भाजप लढणार किंवा किती जागांवर शिवसेना लढणार यापेक्षा २२७ जागांवर महायुती लढणार हे महत्त्वाचे आणि त्यादृष्टीने उर्वरीत जागांवर अन्य पक्षांचे उमेदवार पाहून निर्णय होईल, असे ना. उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची असा निर्धार दोन्ही पक्षांंनी केला आहे. शिवसेनेच्यावतीने माजी खा. राहुल शेवाळे, ना. उदय सामंत तर भाजपच्यावतीने त्यांचे मुंबईचे अध्यक्ष आ. अमित साटम, मंत्री आशिष शेलार हे चर्चेमध्ये सहभागी आहेत. ज्या २० जागांवर पेच निर्माण झाला आहे त्या जागांसाठी विधानसभा निवडणुकीच्यावेळी वापरलेला निलेश राणे फॉर्म्युला कोंडी फोडू शकतो. यावर आता दोन्ही पक्षांकडून विचारविनिमय सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी अनेक मतदारसंघांवर भाजप आणि शिवसेना या दोघांनीही दावा केला होता. त्यावर ‘उमेदवार तुमचा पण चिन्ह आमचं’ असा तोडगा निघाला होता. या तोडग्यांतर्गत कोकणात मालवण- कुडाळ मतदारसंघासाठी तेव्हा भाजपमध्ये असलेल्या निलेश राणेंना शिवसेनेत प्रवेश देवून धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी देण्यात आली. मुुंबईत देखील अंधेरी पश्‍चिम मतदारसंघात भाजपच्या मुरजी पटेलना शिवसेनेत प्रवेश देत शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यात आले. अशी अदलाबदल अन्य काही मतदारसंघातदेखील झाली होती. ती यशस्वीही ठरली. विधानसभा निवडणुकीसाठी अवलंबलेला हा निलेश राणे फॉर्म्युला मुंबई महापालिका निवडणुकीतही वापरला जाण्याच्या हालचाली सुरू आहेत.

टाइम्स स्पेशल

कुडाळ- मालवण मतदारसंघ एकनाथ शिंदेंनी आपल्या पदरात पाडून घेतला आणि भाजपचे खा. नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना पक्षात प्रवेश देवून धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढविली. ही निवडणूक जिंकली सुद्धा. अन्य काही मतदारसंघातदेखील हाच फॉर्म्युला वापरण्यात आला तेथेही काही प्रमाणात यश मिळाले. हा फॉर्म्युला दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडणारा फॉर्म्युला आहे. अदलाबदलीमुळे भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याचे समाधान मिळतं. तर शिंदे सेनेला आपल्या वाट्यातील एक जागा वाढल्याचा आनंद मिळतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा फॉर्म्युला वापरण्याचा विचार सुरू आहे. चार ते पाच जागांवर अशा प्रकारे उमेदवारांची बदला बदली होवू शकते. त्याचप्रमाणे असाच प्रयोग भाजप-शिंदे सेना किंवा युतीत त्यांच्यासोबत असलेल्या रिपब्लीकन पक्षाबाबतही होऊ शकतो. रामदास आठवलेंचा भारतीय रिपब्लीकन पक्ष हा भाजपसोबत असून आनंदराज आंबेडकरांची रिपब्लीकन सेना शिंदेंसोबत आहे. त्यांनाही या फॉर्म्युल्याचा लाभ दिला जावू शकतो. दरम्यान या अदलाबदलीच्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू असतानाच सोमवारी दुपारी १.३० वा.च्या सुमारास खा. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन नेत्यांमध्ये सुमारे २०मिनिटे चर्चा झाली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर झालेली ही पहिलीच भेट होती. या पार्श्‍वभूमीवर चर्चा झाल्याचे कळते. त्याचबरोबर मुुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजप- शिवसेना युतीचा मुकाबला होणार असल्याने या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी खा. नारायण राणेंकडे मोठी विशेष जबाबदारी दिल्याची चर्चाही सुरू आहे. खा. राणे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना थेट काही सांगितले नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खा. नारायण राणे हे सक्रीय झाले आहेत. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ठाकरे गटाला शह देण्यासाठी राणेंची तोफ धडाडणार आहे. कोकणी वस्ती असलेल्या भागाची जबाबदारी फडणवीसांनी खा. नारायण राणेंवर सोपविली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे उमेदवार जेथे स्ट्रॉंग आहेत तेथे नारायण राणेंच्या सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg