loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शनिवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली. यात अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) हा तरुण बुडून बेपत्ता झाला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर जयगड सागरी पोलीस ठाण्याने तातडीने शोधमोहीम हाती घेत सायंकाळपासून रात्रीभर समुद्रकिनाऱ्यावर गस्त वाढवली. स्थानिक ग्रामस्थ, जीवरक्षक ग्रामरक्षक दलाचे सदस्य व पोलीसपाटील यांच्या विशेष सहकार्याने रात्रभर सुरू असलेल्या या शोधमोहिमेला पहाटेच्या सुमारास यश आले. एमटीडीसी पर्यटन निवाससमोरील समुद्रकिनारी भागात पहाटे साडेचारच्या सुमारास हा तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तातडीने वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची कदम यांनी तपासणी केली असता अमोल ठाकरे याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्रातील पथकाने केला. घटनेत बुडालेल्या दुसऱ्या दोघा तरुणांना विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४), दोघेही रा. भिवंडी यांना समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले. शनिवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढलेली असतानाच ही घटना घडली. समुद्रात नाहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांच्या गटातील तिघे खोल पाण्यात गेले आणि ते बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांच्या सोबत किनाऱ्यावर असलेल्या मित्रांनी मदत मागितली.

टाइम्स स्पेशल

या वेळी मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या जेटस्कीवरील व्यावसायिकांनी तात्काळ धाव घेऊन तिघांना बाहेर काढले. स्थानिक जीवरक्षक आणि व्यावसायिकांचेही या बचावकार्यामध्ये मोलाचे योगदान राहिले. तिघांनाही तातडीने गणपतीपुळे देवस्थानच्या ॲम्बुलन्सने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोघे सुरक्षित स्थितीत आले; मात्र अमोल ठाकरेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पीएसआय संजय पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अलीकडच्या काळात गणपतीपुळे किनाऱ्यावर बुडण्याच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पर्यटकांना वारंवार खोल पाण्यात न जाण्याच्या सूचना दिल्या जात असूनही काहीजणांचा अतिउत्साह आणि बेजबाबदारपणा धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. या दुर्दैवी घटनेने गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg