loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅससाठी लांबच लांब रांगा

​रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅससाठी उडालेला हाहाकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. इंधनाचा पुरवठा मागणीपेक्षा प्रचंड कमी होत असल्याने शहरातील इंधन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यातच जेके फाईल येथील मुख्य सीएनजी पंप काही तांत्रिक कारणांमुळे अचानक बंद पडल्याने या समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. परिणामी, स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि रत्नागिरीत येणारे पर्यटक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. भरउन्हात इंधनासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असून, शहरात जागोजागी पेट्रोल आणि सीएनजीसाठी तब्बल अडीच ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शहरातील नियमित पंपांवर इंधन पोहोचताच काही तासांतच ते संपत असून, अनेक पंपांवर 'पेट्रोल/सीएनजी संपले आहे' असे फलक झळकत आहेत. रिक्षाचालकांचे तर अतोनात हाल होत असून, पहाटेपासून ते रात्रीपर्यंत त्यांना केवळ गॅस मिळवण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे; दिवसभर रांगेत घालवला तर व्यवसाय कधी करायचा आणि कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, असा संतप्त सवाल रिक्षाचालक विचारत आहेत. पर्यटकांनाही या समस्येचा मोठा फटका बसत असून, रत्नागिरीची प्रतिमा मलिन होत आहे.

टाइम्स स्पेशल

इतकी गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती असतानाही जिल्हा प्रशासन मात्र या समस्येकडे पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. सध्या मंत्रालय स्तरावरून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांमध्ये आणि त्यांच्या 'सरबराईत'च जिल्हा प्रशासनातील अधिकारी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ज्या मार्गांवरून हे अधिकारी रोज ये-जा करतात, त्याच मार्गांवर जनतेच्या मैलोन्‌मैल लांब रांगा लागल्या आहेत, पण तरीही प्रशासनाला सामान्य जनतेचे हे हाल का दिसत नाहीत? इंधन टंचाईच्या या गंभीर विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते, मात्र तसे काहीही होताना दिसत नाही. जेके फाईल येथील बंद पडलेला सीएनजी पंप युद्धपातळीवर सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली आणि जनतेचा संयम सुटला, तर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्हीआयपी दौऱ्यांमधून वेळ काढून जिल्हा प्रशासनाने या ज्वलंत प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी तीव्र मागणी आता संपूर्ण रत्नागिरीतून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg