loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री व आमदारांच्या इशाऱ्यांना एलईडी माफियांकडून केराची टोपली, बाबी जोगी यांची टीका

मालवण (प्रतिनिधी) - "एलईडी फिशिंग केली तर बोटी विसरून जा," असा कडक इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री देत आहेत, तर दुसरीकडे "बेकायदेशीर बोटी फुटणार" अशा गर्जना स्थानिक आमदार आमसभेत करत आहेत. मात्र, या इशाऱ्यांनंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी उलट अधिकच चिघळली आहे. मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या इशाऱ्यांना केराची टोपली दाखवत एलईडी माफिया आता थेट सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापर्यंत घुसखोरी करत आहेत. या प्रकारामुळे हे इशारे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहेत की काय?' असा संतप्त सवाल मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारीचा झगमगाट पुन्हा एकदा दिसून येत असल्याने मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी पालकमंत्री व आमदार यांनी अनधिकृत मासेमारीविरोधात दिलेल्या इशाऱ्यांचा समाचार घेतला आहे. ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत, त्याच जिल्ह्याच्या समुद्रात कायद्याने प्रतिबंधित असलेली एलईडी फिशिंग बिनधास्तपणे सुरू आहे. मंत्र्यांनी इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून या एलईडी बोटींनी अधिक आक्रमकपणे किनाऱ्यालगत येऊन मासेमारी सुरू केली आहे. मत्स्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांची ही 'बघ्याची भूमिका' संशयास्पद वाटत आहे, अशी टीका बाबी जोगी यांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवर एलईडी मासेमारीला कायद्याने बंदी आहे. असे असतानाही सिंधुदुर्गच्या समुद्रात सुरू असलेल्या या लुटीमुळे पारंपरिक मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मासळीचा दुष्काळ पडू लागल्याने मच्छीमारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मंत्र्यांच्या शब्दाला जर माफिया जुमानत नसतील, तर हे प्रशासनाचे अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचा या माफियांना छुपा पाठिंबा? आज मच्छीमार रक्ताचे पाणी करून जगत असताना लोकप्रतिनिधींना त्यांची तळमळ का नाही? असा प्रश्नही जोगी यांनी उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने सध्या अनियंत्रित मासेमारी सुरू आहे, ते पाहता या महोदयांच्या कार्यकाळात सिंधुदुर्गची किनारपट्टी मच्छीमारीसाठी १०० टक्के ओस पडेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जर वेळीच यावर ठोस कारवाई झाली नाही, तर हा असंतोष येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही, असेही जोगी यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg