loader
Breaking News
Breaking News
Foto

तुळशी धरणात बुडून युवकाचा मृत्यू

खेड - मंडणगड तालुक्यातील तुळशी गणेशवाडी येथे सुट्टीसाठी आलेल्या अमित बाळकृष्ण शिगवण (वय ३२) यांचा तुळशी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० मे रोजी घडली. या घटनेमुळे तुळशी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून धरण परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शिगवण हे मुंबई येथे वास्तव्यास होते. मे महिन्याच्या सुट्टीसाठी ते आपल्या मूळ गावी तुळशी गणेशवाडी येथे आले होते. रविवारी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबीयांसोबत तुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी किनाऱ्यालगत पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक नितीन गवारे, बीट अंमलदार दत्ताराम बाणे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, धरणातील खोल पाणी आणि कालव्याच्या दरवाज्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते. सोमवारी सकाळी महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. प्रशांत साळुंखे आणि त्यांच्या पथकाने शोधमोहीम राबवत अखेर अमित शिगवण यांचा मृतदेह चिखलात अडकलेल्या अवस्थेत शोधून काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे पाठविण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, तालुक्यातील तिडे, भोळवली, चिंचाळी, पंदेरी आणि तुळशी या धरण परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मे महिन्यात पाण्याची टंचाई असल्याने अनेक नागरिक धरण परिसरात आंघोळीसाठी जातात. मात्र, पाण्याची खोली, गाळ आणि चिखल यांची माहिती नसल्याने दुर्घटनांचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. धरण परिसरात सुरक्षा रक्षक किंवा इशारा फलक नसल्याने यापूर्वीही अशा दुर्घटनांमध्ये नागरिकांचे बळी गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाने धरण परिसरात तातडीने सुरक्षाव्यवस्था उभारावी, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg