loader
Breaking News
Breaking News
Foto

समुद्रावर धावणार वॉटर मेट्रो, कोकण विकासाचा नवा अध्याय

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्यसरकारने आता जलवाहतुकीचा मोठा पर्याय पुढे आणला आहे. 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई-विरार, नवी मुंबई, उरण ते अलिबागपर्यंत जलमार्गांचे विस्तीर्ण जाळे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने नॉर्वेच्या या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. यातील जहाजबांधणी उद्योग रायगड जिल्ह्यात दिघी परिसरात होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने रायगडचा विकास अधिक झपाट्याने होणार आहे. मुंबई ही सात बेटांवर वसलेली नगरी. त्यामुळे शहराला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि ठाणे, वसई-विरार, कल्याण, उरणपर्यंत पसरलेल्या खाड्या जलवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त मानल्या जात आहेत. ब्रिटिश काळात तसेच मराठा साम्राज्याच्या काळातही या भागात जलवाहतूक अस्तित्वात असल्याचे दाखले आहेत. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याच जलमार्गांना पुन्हा नवजीवन देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२१ जलमार्ग, २४ टर्मिनल उभारणारया प्रकल्पांतर्गत एमएमआर क्षेत्राततब्बल २१ जलमार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी २४ आधुनिक टर्मिनल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, उरण आणि अलिबागपर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मेट्रो आणि मोनोरेलनंतर जलवाहतूक हा मुंबईसाठी वाहतुकीचा नवा पर्याय ठरणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. समुद्र आणि खाड्यांचा वापर जलवाहतुकीसाठी करताना काही तांत्रिकअडचणी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी गाळ साचणे, खडकाळ भाग आणि कमी पाण्याची पातळी ही मोठी आव्हाने ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण तांत्रिक अभ्यास आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी नॉर्वेच्या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या जलमार्गावर धावणाऱ्या आधुनिक आणि पर्यावरणपूरक बोटी व जहाजांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात मोठा जहाजबांधणी उद्योग उभारण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. यासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये समुद्रकिनारी योग्य जागेचा शोध सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या प्रकल्पाकरिता सुयोग्य जागा रायगड जिल्ह्यात दिघी येथे असल्याचे प्राथमिक निरिक्षणातून समोर आले आहे.

टाइम्स स्पेशल

या जहाजबांधणी उद्योगाला प्रस्तावित 'दिघी-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर'चा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. रायगडमधील दिघी बंदराला उत्तर भारताशी जोडणाऱ्या या औद्योगिक कॉरिडॉरमुळे मालवाहतूक, निर्यात आणि लॉजिस्टिक क्षेत्राला गती मिळणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर नवीन उद्योग, रोजगार आणि पूरक व्यवसाय निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मुंबई-नवी मुंबई जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र महागडी तिकिटे, कमी प्रवासी प्रतिसाद आणि टर्मिनलपर्यंत पोहोचण्याच्या अडचणींमुळे ती सेवा अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही. त्यामुळे नव्या वॉटर मेट्रो प्रकल्पात परवडणारे तिकीटदर, जलद सेवा आणि इतर वाहतूक व्यवस्थेशी सुसंगत जोडणी यावर सरकारला विशेष भर द्यावा लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg