रत्नागिरी : शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, छप्परे उडणे तसेच पाणी साचण्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या या वादळी वातावरणामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जाकादेवी येथे रघुनाथ गोताड यांच्या भात गिरणीवरील पत्र्याचे छप्पर वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. या घटनेनंतर सभापती प्रविण पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप, शिवसेना विभाग संघटक मिलिंद खानविलकर तसेच पंचायत समिती सदस्य नेहा गावणकर यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. याच परिसरातील जाकादेवी शाळा क्रमांक 3 चेही मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे शाळेवरील कौले उडाली. सुदैवाने शाळांना सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असता. दरम्यान, नरबे येथील गोवळकरवाडीत रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. परचुरी परिसरातही अनेक झाडे मोडून पडल्याच्या घटना घडल्या. कुवारबाव परिसरात महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या अवकाळी पावसाचा फटका उक्षी, लाजूळ, करबुडे, खालगाव आदी भागांनाही बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, पाणी साचणे आणि किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. सोमेश्वर येथील शेलारवाडीत मोठे झाड कोसळून अंगणवाडी इमारत अक्षरशः जमीनदोस्त झाली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी अंगणवाडी बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. जाकादेवी येथे तलाठी कार्यालयावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. तर गोळप मोहल्ला परिसरात अनेक घरांची पत्रे उडाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गावखडी परिसरातही घरांवरील कौले उडाल्याने काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलावे लागले. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता.
वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांत नुकसान झाल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सर्व तलाठ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारपासून नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. रविवारी ते प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ यांनीही विविध भागांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या अवकाळी वादळामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.