खेड :- गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या एका लढवय्या नेतृत्वाचा अंत झाला आहे. समग्र शिक्षा कर्मचारी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष आणि धारणी (जि. अमरावती) येथे विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेले विजय बापूरावजी दामले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आझाद मैदानावरील संघर्षातून घरी परतताच काळाने त्यांच्यावर झडप घातली, ज्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ९ मार्च २०२६ पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या न्याय्य हक्कांसाठी कंत्राटी कर्मचारी लढा देत आहेत. विजय दामले या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाले होते. मात्र, "अर्ध्या कर्मचाऱ्यांना न्याय आणि अर्ध्यांना वाऱ्यावर" या सरकारच्या दुजाभाव करणाऱ्या धोरणामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. "आपण कधी कायम होणार? आपल्या कुटुंबाचे भवितव्य काय?" या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. आंदोलनादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने ते आपल्या पत्नी आणि मुलाबाळांच्या भेटीसाठी गावाकडे गेले, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
दामले सरांचा मृत्यू हा केवळ नैसर्गिक अपघात नसून, तो अनिश्चिततेने आणि मानसिक छळाने घेतलेला बळी आहे, अशी भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. "ज्या शाश्वत नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आयुष्याची उमेदीची वर्षे खर्च केली, ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच व्यवस्थेच्या दिरंगाईने त्यांचा बळी घेतला," अशा शब्दांत सहकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. समग्र शिक्षा योजनेत कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे सत्र थांबायला तयार नाही. विजय दामले यांच्या निधनासह आतापर्यंत तब्बल २५७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नोकरीत असताना मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहणारे 'मायबाप' सरकार आणखी किती बळींची वाट पाहत आहे? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.
विजय दामले सरांचे जाणे ही संघटनेची आणि त्यांच्या कुटुंबाची कधीही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. "दामले सरांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. ज्या हक्कासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला, तो आझाद मैदान, मुंबई येथील लढा आता अधिक तीव्र करू," असा निर्धार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.