loader
Breaking News
Breaking News
Foto

१३ लाखाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची मुक्तता

गुहागर - गुहागर तालुक्यातील कुटगिरी या गावामध्ये राहत असलेल्या आंबोकर कुटुंबीयांना सन २०१४ मध्ये त्यांचे जुने घर दुरुस्त करून त्या ठिकाणी नवीन घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांनी पेवे येथील बांधकाम ठेकेदार मुश्ताक खान सरगुरो यांना घर बांधण्याचे कंत्राट दिले. घर बांधकामाची एकूण किंमत ८ लाख इतकी ठरवण्यात आली त्यानंतर घराचे जुने वापरते सामान याची किंमत ४ लाख ६५ हजार इतकी ठरवण्यात आली. एकूण १३ लाख इतक्या किमतीमध्ये घर बांधून देण्याचे बांधकाम ठेकेदार मुश्ताक खान सरगुरो यांनी कबूल केले होते व तसा करारही दोघांच्यामध्ये करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन २०१४ ते सन २०१९ या काळामध्ये कंत्राटदाराने घराचे बांधकाम न करता ते अपूर्ण अवस्थेत ठेवले. पाच वर्षाच्या काळात सुद्धा वारंवार पाठपुरावा करून देखील घर बांधून पूर्ण झाले नाही. या काळात त्या घरातील दोन वयोवृद्ध माणसे दुसर्‍यांच्या घरामध्ये मयत झाली. या गोष्टीमुळे हतबल होऊन आंबोकर कुटुंबीयांनी सन २०१९ मध्ये गुहागर पोलीस स्टेशन येथे आरोपी ठेकेदाराविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुहागर पोलिसांनी त्यांच्या तपास कामांमध्ये, घराच्या जागेचा पंचनामा, साक्षीदारांचे जाबजबाब आणि आर्थिक व्यवहार संबंधी बँक खात्याचे स्टेटमेंट या सर्व पुराव्यानिशी आरोपी कंत्राटदार याचे विरुद्ध गुहागर न्यायालयामध्ये सविस्तर दोषारोप पत्र दाखल केले होते. या केसच्या सुनावणी दरम्यान आरोपी कंत्राटदार मुश्ताक खान याचे वतीने फौजदारी वकील अ‍ॅड. संकेत साळवी यांनी कामकाज पाहिले. बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा असल्याने तालुक्यातील बहुतांशी लोकांचे या खटल्याच्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले होते. सरकारी पक्षाच्या सर्व साक्षीदारांचा उलट तपास अ‍ॅड. संकेत साळवी यांनी केला. या खटल्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकीलांनी युक्तिवाद करताना, आरोपी याचे विरुद्ध गुन्हा साबित झालेला असून आंबोकर कुटुंबीयांनी आरोपी यांना दिलेले पैसे व त्याबाबतचा आर्थिक व्यवहार कोर्टासमोर योग्य पद्धतीने मांडण्यात आला आहे तसेच आरोपी आणि आंबोकर कुटुंब यांच्या दरम्यान झालेला करार देखील कायदेशीररित्या शाबीत झालेला आहे त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध झालेले असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी असा युक्तिवाद केला.

टाईम्स स्पेशल

आरोपी कंत्राटदार यांच्यावतीने अ‍ॅड. संकेत साळवी यांनी युक्तिवाद करताना सरकारी वकिलांचे सर्व मुद्दे खोडून काढले. मुळातच आरोपी कंत्राटदार आणि आंबोकर कुटुंबीय यांच्यामध्ये झालेल्या कराराचा जर भंग झाला असेल तर त्यांनी सक्षम दिवाणी न्यायालयांमध्ये जाऊन दाद मागितली पाहिजे असा युक्तिवाद अ‍ॅड. संकेत साळवी साळवी यांनी केला. त्याचप्रमाणे कराराची तारीख आणि घराचे बांधकाम सुरू केल्याची तारीख यामध्ये तफावत असून करार हा बांधकाम सुरू झाल्यानंतर तीन ते चार महिन्याच्या अंतराने करण्यात आलेला आहे ही बाब आरोपीचे वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आली. तसेच आंबोकर कुटुंबीयांनी आरोपी कंत्राटदार यांना जितके पैसे दिले तितक्या पैशांचे त्यांनी बांधकाम पूर्ण केलेले असून अचानक फिर्यादी कुटुंबीयांनी वाढीव बांधकाम करण्यास सांगितल्याने आरोपी यांनी काम थांबवले. पोलिसांनी त्यांचे संपूर्ण तपास कामांमध्ये आत्तापर्यंत झालेल्या बांधकामाचे शासकीय मूल्यांकन रेकॉर्डवर आणलेले नाही. त्यामुळे आरोपीचे विरुद्ध केवळ पैसे घेतले म्हणून गुन्हा शाबीत होऊ शकत नाही असा बिनतोड युक्तिवाद अ‍ॅड. संकेत साळवी यांनी केला. केसच्या तपास कामातील कागदपत्रे आणि अ‍ॅड.संकेत साळवी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून गुहागर न्यायालयाने संशयित आरोपी मुश्ताक खान सरगुरो याची फसवणुकीचे गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. या खटल्याच्या कामकाजामध्ये अ‍ॅड.संकेत साळवी यांना त्यांचे सहकारी अ‍ॅड. अलंकार विखारे, अ‍ॅड. सुप्रिया वाघधरे, अ‍ॅड. मानसी सोमण आणि अ‍ॅड. रोशनी पवार यांनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg