loader
Breaking News
Breaking News
Foto

सैतवड्यात बिबट्याचा थरार सुरूच! तिसऱ्या हल्ल्याने ग्रामस्थ भयभीत

​रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील सैतवडा परिसरात बिबट्याचा वावर आता ग्रामस्थांच्या जिवावर उठला असून, सैतवडे-बलभीमवाडी येथे बिबट्याने तिसरा हल्ला चढवला. या ताज्या हल्ल्यात स्थानिक शेतकरी प्रदीप पवार यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वारंवार मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सैतवडा आणि आसपासच्या वाड्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे. काल रात्री बलभीमवाडी येथील प्रदीप पवार यांच्या गोठ्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला. प्राण्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने घरच्यांनी धाव घेतली, तेव्हा बिबट्या तेथून पसार झाला. मात्र, या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ​विशेष म्हणजे, ही या भागातील तिसरी घटना आहे. यापूर्वीही दोन वेळा बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. प्रत्येक घटनेनंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले, पंचनामे झाले, परंतु ठोस उपाययोजना मात्र शून्य आहेत. "बिबट्या आता फक्त जनावरांवर नाही, तर माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमची मुले-बाळे भीतीपोटी घराबाहेर पडायला घाबरत आहेत," अशा भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, 'वरिष्ठांकडून आदेश नाहीत' किंवा 'तांत्रिक अडचणी' अशी कारणे पुढे करून वनविभागाकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत एखादा नरबळी जात नाही, तोपर्यंत प्रशासन जागे होणार नाही का? असा संतप्त सवाल आता बलभीमवाडीतील नागरिक विचारत आहेत. ​सध्या सैतवडा परिसरात भीतीचे सावट असून शेतकरी आणि बागायतदार कामावर जाण्यास धजावत नाहीत. वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg