loader
Breaking News
Breaking News
Foto

“अंधाराला हरवणारी शस्त्रक्रिया, हजारो डोळ्यांना दिला प्रकाश" ठाणे सिव्हिलच्या ‘डोळ्यांच्या देवदूत’ डॉ. शुभांगी अंबाडेकर!”

ठाणे (अमोल पवार) - डोळे… माणसाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान देणगी. जग पाहण्याची, माणसं ओळखण्याची, स्वप्नं रंगवण्याची ताकद या दोन छोट्याशा डोळ्यांत दडलेली असते. आणि हेच डोळे जेव्हा अंधुक होतात, तेव्हा फक्त दृष्टीच हरवत नाही तर आयुष्याचा आत्मविश्वासही डळमळतो. अशा वेळी जर कोणी हात धरून पुन्हा प्रकाश दाखवणारा भेटला, तर तो डॉक्टर नसतोच; तो देवदूतच असतो. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी नितीन अंबाडेकर या अशाच एका अर्थाने डोळ्यांसाठी देवदूत ठरल्या आहेत. शासकीय रुग्णालयात काम करत असताना त्यांनी हजारो मोतीबिंदू आणि काचबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. परंतु त्यांचं मोठेपण केवळ आकड्यांत नाही; तर प्रत्येक रुग्णाशी जुळलेल्या नात्यात आहे. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्णांची मोठी रांग असते. अनेक जण प्राधान्याने “शुभांगी मॅडमकडे दाखवा” अशी विनंती करताना दिसतात. कारण त्यांना ठाऊक असतं इथे फक्त उपचार नाही, तर आपलेपणा मिळतो. त्यांचा आवाज शांत, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यांत रुग्णासाठीची करुणा हीच त्यांची खरी ओळख आहे. भिवंडीतील ४५ वर्षीय ताहीर अन्सारी यांची कहाणी तर अक्षरशः थरारक आहे. जन्मतः मुकबधिर असलेल्या ताहीर यांची दृष्टीही धूसर होत गेली. दोन्ही डोळ्यांना गंभीर मोतीबिंदू झाला. खासगी रुग्णालयांनी जोखीम मोठी असल्याचे सांगून शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. कुटुंब हतबल झाले होते. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयाने जबाबदारी स्वीकारली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन थिएटरमधील तणावपूर्ण वातावरणात त्यांनी संयम आणि कौशल्य दाखवत ताहीरच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला. आज ताहीर स्पष्ट पाहू शकतात. त्यांच्या कुटुंबासाठी हा चमत्कारच होता. ७९ वर्षीय अजीज शेख यांची कहाणीही हृदयस्पर्शी आहे. वयोमानानुसार दृष्टी कमी होत गेली आणि काम करणे अवघड झाले. आर्थिक परिस्थिती बेताची. वृद्धापकाळातही स्वतःचा संसार चालवण्यासाठी कामाची गरज होती; पण डोळे साथ देत नव्हते. समाजसेवकाच्या मदतीने ते सिव्हिल रुग्णालयात आले. तपासणीत दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू असल्याचे स्पष्ट झाले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि अजीज यांच्या आयुष्यात पुन्हा उजेड आला. त्यांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू हेच डॉक्टरांच्या कार्याचे खरे पारितोषिक होते. मुरबाडमधील पाच वर्षांची राणी आणि आंबिवलीतील दहा वर्षांचा विजय दोघांनाही लहान वयातच मोतीबिंदू झाला होता. बालपणीच अंधुक जग पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पालक चिंतेत होते. सरकारी रुग्णालयात योग्य उपचार मिळतील का? मात्र सिव्हिल रुग्णालयाने आश्वस्त केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्या छोट्या डोळ्यांत पुन्हा चमक दिसली. बालपण पुन्हा रंगीत झाले.

टाईम्स स्पेशल

काचबिंदूसारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती करताना त्या नेहमी सांगतात की, “डोळ्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. वेळेत निदान झाले तर अंधत्व टाळता येऊ शकते. त्यांच्यासाठी प्रत्येक यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे केवळ वैद्यकीय कामगिरी नाही; तर एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात परत आलेला आनंद आहे.” आजच्या स्पर्धात्मक आणि व्यावसायिक जगात सेवाभाव जपणारे डॉक्टर दुर्मिळ होत चालले आहेत. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉ. शुभांगी अंबाडेकर या त्या अपवादांपैकी एक आहेत. त्यांच्या हातातील शस्त्रक्रियेची नाजूक हालचाल, डोळ्यांतील करुणा आणि मनातील सेवाभाव यामुळेच रुग्ण त्यांना “डोळ्यांचा देवदूत” म्हणतात. डोळ्यांत प्रकाश देणाऱ्या या देवदूताला शब्दांत माववणे कठीण आहे. कारण त्यांनी उजळवलेले आयुष्य हेच त्यांच्या कार्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या प्रत्येक शस्त्रक्रियेतून केवळ दृष्टी नाही, तर आशा, आत्मविश्वास आणि नवजीवन जन्माला येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg