loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा धुडगूस नवीन गस्ती नौका थांबवणार

रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरीच्या समुद्रात कमी वाव अंतरावर पर्ससीननेट नौका दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी करत असल्याच्या तक्रारी मत्स्य व्यवसाय विभागाकडे येवू लागल्या आहेत. किनाऱ्यावर राजरोस चालणाऱ्या एलईडी मासेमारीने तारली मासा मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडत आहे. या किनाऱ्यावरील बेकायदेशीर मासेमारीला आणि परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीसाठी बुधवारी नवीन शारदा नावाची स्पीड बोट दाखल होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 280 पर्ससीननेट नौका आहेत. या नौकांना साडेबारा नॉटीकल मैल अंतराच्या आत समुद्रात मासेमारी करण्यास 1 जानेवारीपासून बंदी आहे. पहिल्या दोन महिन्यात साडेबारा नॉटीकल मैल बाहेर केंद्र शासनाच्या अखत्यारितील समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्या नौकांना खर्च इतकी मासळी मिळत नव्हती. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक नौका मालकांनी बेकायदेशीरपणे किनाऱ्यावर दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री एलईडीच्या प्रकाशात मासेमारी करण्यास प्रारंभ केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बंदरापासून जवळच्या अंतरावर मासेमारी केल्याने इंधन व इतर खर्चाची बचत होते. मोठ्या प्रमाणात तारली मासा पकडला जात आहे. त्यामुळे या तारली मासा मिरकरवाडा बंदरात मोठ्या प्रमाणात उतरला जात आहे. या मासळीला फिशमिल कंपन्यांकडे चांगला दरही मिळत आहे. अद्यावत गस्ती नौका नसल्याने कमी वावात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांना आयतीच संधी मिळाली. त्याचबरोबर अशी किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांमुळे पारंपरिक नौकांना मासा मिळत नसल्याची ओरड अनेक पारंपरिक मच्छीमार नेत्यांकडून होत होती. परंतू आता पारंपरिक मच्छीमार नेत्यांची कोणतीच ओरड अथवा तक्रारी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरापर्यंत कमी वावात किंवा किनाऱ्यालगत समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांचे तसेच एलईडी नौकांचे चित्रिकरण मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या भ्रमणध्वनीवर पाढवले जात होते. यंदा मात्र पारंपरिक आणि पर्ससीन नौकांची मासेमारी गुण्या गोविंदाने सुरु आहे.

टाईम्स स्पेशल

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाची जुनी लाकडी नवदुर्गा नावाची गस्ती नौका किनाऱ्यावरील कारवाईसाठी उपयुक्त असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्याचबरोबर रत्नागिरीच्या समुद्रात घुसखोरी करणाऱ्या मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांवर लाकडी गस्ती नौकेने कारवाई करण्यासाठी जाणे धोक्याचे होते. त्यामुळे घुसखोर नौकांवरही कारवाई होत नव्हती. परंतू आता बुधवारी नवीन स्टीलची मजबुत स्पीड नौका सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाला मिळत आहे. त्यामुळे किनाऱ्यावरच्या मासेमारीला आणि घुसखोरीला आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg