loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता रमेश चव्हाण अनंतात विलीन

रत्नागिरी - रत्नागिरीतील सुप्रसिद्ध स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्री रोगतज्ञ म्हणून गौरविण्यात आलेल्या डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे शुक्र. दि. २० मार्च रोजी देहावसान झाले. निधनसमयी त्यांचे वय ८६ वर्षे इतके होते. डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार सुरु होते. परंतु शुक्रवारी पहाटे त्यांची प्रकृती वैद्यकीय उपचारांना साथ देईनाशी झाली व त्यातच त्यांचे देहावसान झाले. त्या मूळच्या बडोदा येथील होत. विवाहानंतर त्या रत्नागिरीत आल्या व रत्नागिरीला जणू त्यांनी आपले मानले. त्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्री रोगतज्ञ म्हणून सुपरिचीत होत्या. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायू हॉस्पिटलची स्थापना त्यांनी पती डॉ. रमेश चव्हाण यांच्यासह त्यांनी मोठ्या परीश्रमाने केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. सौ. सुनिता चव्हाण या उच्च विद्याविभूषित होत्या. त्या सर्जन होत्या व लंडन येथून त्यांनी एफ.आर.सी.एस.ही उच्च पदवी देखील संपादन केली होती. कोकणातील एक सुप्रसिद्ध सर्जन म्हणून त्यांचा नावलौकीक होता. त्यांचा सामाजिक कार्यातही सदैव वावर असे. रत्नागिरीतील मराठा मंडळाच्या त्या एक संस्थापिका होत. त्यांनी संपूर्ण हयातभर मराठा मंडळासाठी कार्य केले. मंडळाच्या प्रत्येक लहानसहान कार्यावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. महिलांसाठीही त्यांनी खूप मोठे सामाजिक कार्य केले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे निवासस्थानी स्वस्तिक बंगला, माळनाका, रत्नागिरी येथे दुपारी २ ते सायं. ४ वा. पर्यंत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निवासस्थान स्वस्तिक बंगला, माळनाका येथून कोकणनगर स्मशानभूमीत सायं. ४ वा. निघाली व तेथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी समाजाच्या विविध थरातील मान्यवर व त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे त्यांचे पती डॉ. रमेशराव चव्हाण, कर्तबगार चिरंजीव डॉ. नितीन चव्हाण, कन्या सौ. पल्लवी यादव व डॉ. सौ. वैभवी इंदुलकर (पूर्वाश्रमीच्या डॉ. विशाखा चव्हाण) व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टाइम्स स्पेशल

डॉ. सौ. सुनिता चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त शहरात पसरताच सर्वत्र तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे संपादक श्री. उल्हास घोसाळकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, ‘‘डॉ. सुनिता चव्हाण या निष्णात सर्जन होत्याच शिवाय तळमळीच्या सामाजिक नेत्या होत्या. विविध क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे कार्य सुरुच होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रातील जणू मातृतुल्य व्यक्तीमत्व हरपले आहे. आदर्श ठेवावा असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो’’ अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली. रत्नागिरीतील श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने देखील डॉ. सुनिता चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी सांगितले की, डॉ. सुनिता चव्हाण या जिल्ह्यातील सर्व भगिनींना आदर्श म्हणून ओळखल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील त्या पहिल्या महिला स्त्री रोग तज्ञ होत. मोठ्या परीश्रमाने त्यांनी वैद्यकीय ज्ञान संपादन केले व ते सदैव गोरगरीबांसाठी उपयोगात आणले. सामाजिक कार्यातही त्या सदैव अग्रभागी असत, त्यांची सर्वांना उणीव भासेल’’ अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg