loader
Breaking News
Breaking News
Foto

आता प्रतिक्षा जि.प. व पं.स.निवडणुकीची ; यावेळच्या निवडणुकीत कुणबी फ्रॅक्टर महत्वाचा ठरणार

रत्नागिरी ( संतोष कांबळे) - शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता सारे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीकडे लागले असून राजकीय पक्षांनी या निवडणुकीचीसुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी असा सरळ सामना होणार असला तरी यावेळी बळीराज सेना निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन दिवसांपूर्वी अतिशय रंगतदार अवस्थेत पार पडल्या. तीन डिसेंबरलाच मतमोजणी होणार होती पण न्यायायालयाने काही नगरपालिकांच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्यामुळे मतमोजणी २१ डिसेंबरपर्यत लांबणीवर पडली.आता ऐन थंडीत निकालाची प्रतिक्षा कुडकुडत करण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. शहरातील निवडणुका संपल्यामुळे आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत शहरी भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी घाम गाळल्यावर आता ग्रामीण भागातील नेते,प्रमुख कार्यकर्ते बाह्या सरसावुन तयार झाले आहेत. किंबहुना शहरी भागातील काही वार्डातील प्रचाराची धुरा ग्रामीण नेतृत्वासाठी इच्छुक उमेदवारांवर सोपविण्यात आली होती . जि.प. व पं.स. निवडणुकीत उमेदवारी हवी आहे ना? मग शहरात घाम गाळा असा आदेशच सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी संबंधितांना दिला होता. त्यामुळे काही वार्डातील प्रचारात शहरी कार्यकर्त्यांपेक्षा ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारच प्रचारामध्ये जास्त सक्रिय झालेले दिसून आले . यावेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होतील असे सध्याचे चित्र आहे. शहरात जसा “ पैसा “जोरात चालला तसा प्रकार जि.प. व पं.स. निवडणुकीत होणार आहे असे अगदी छातीवर बोट ठेवून काही प्रमुख कार्यकर्ते सांगताना दिसत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत अपेक्षित असली तरी यावेळी कुणबी फ्रॅक्टर महत्वाचा ठरणार आहे. बळीराज सेना या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरणार असून त्यांनी अगदी छुप्या पद्धतीने संघटन वाढविण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, गुहागर, मंडणगड, संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी हे तालुके कुणबी बहुल तालुके म्हणून ओळखले जातात.

टाइम्स स्पेशल

एकेकाळी सात आमदार आणि एक खासदार कुणबी समाजाचा होता. कुणबी समाजाची प्रचंड मोठी ताकद तेव्हाच्या एकीकृत शिवसेनेने साफ मोडून काढली. आमदारकीला कुणबी उमेदवार नाकारणाऱ्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मात्र कुणबी समाजाला सत्तेची पदे बहाल केली. तेव्हापासून खिळखिळे झालेले कुणबी समाजाचे संघटन पुन्हा कधीच एका पक्षात केंद्रित झाले नाही. विशेष म्हणजे यापूर्वी तत्कालिन काँग्रेसचे नेते सुजित झिमण यांची बहुजन विकास आघाडी,पालघर जिल्ह्यातील विश्वनाथ पाटील यांची कुणबी सेना अशा मातब्बर नेत्यांनी कुणबी समाजाला एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न करून पाहिले. पण तोपर्यंत प्रस्थापित राजकारणात बड्या पदापर्यंत पोहोचलेल्या सर्वच आजीमाजी आमदारांनी कुणबी संघटन मजबूत होऊच दिले नाही. गेल्या दोन दशकात जेव्हा जेव्हा कुणबी समाज एकत्र झाला तेव्हा तेव्हा त्यांच्यातील दिग्गज नेत्याला सत्तेतील पदांचे गाजर दाखवून आपल्याकडे खेचण्यात प्रस्थापित आमदार यशस्वी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुणबी समाजाची ताकद कमी करण्यासाठी इतर ओबीसी जाती जवळ करून त्यांना मानाचे पान देण्याची धुर्त खेळी विद्यमान आमदार खेळत आलेले आहेत. त्यामुळे स्वतंत्र विचारांच्या बाणेदार कार्यकर्त्यांना डावलून “ होयबा “ म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना सातत्याने पुढे आणले जाते आणि बघा आम्ही कसे कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देतो असा दिंडोरा मात्र पिटण्यात येतो. यावेळीसुद्धा असेच घडेल असे बोलले जात आहे. म्हणून बळीराज सेनेने वाडीवस्तीवर जाऊन समाजाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी जी कुणबी समाजाची शकले उडाली होती तसे घडू नये याकरिता आतापर्यंत वेगळी रणनीती आखण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत बळीराज सेनेने गुहागर विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे यांच्या पक्षातर्फे धनुष्यबाण निशाणीवर निवडणुक लढवलेली होती. तिथं त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत बळीराज सेनेने धनुष्यबाण निशाणी ऐवजी स्वतः च्या चिन्हावर निवडणुक लढवली असती तर वेगळे चित्र दिसले असते असे बळीराज सेनेचे कार्यकर्ते सांगत आहे. त्यामुळे बळीराज सेनेने लांजा, राजापूर, रत्नागिरी,संगमेश्वर,गुहागर व मंडणगड या सहा तालुक्यावर फोकस केला असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg