loader
Breaking News
Breaking News
Foto

जठारांचे हवेत किल्ले, सामंतांचे थेट मुख्यमंत्र्यांशी संधान; रत्नागिरीत भाजप आमदारांच्या दौऱ्यांची फक्त हवेतच चर्चा?

​रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात सध्या भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान आमदार प्रमोद जठार यांचे दौरे कमालीचे वाढले असून, त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. जठार यांनी रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यात बैठकांचा सपाटा लावत जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एवढेच नव्हे, तर 'पुढचा नगराध्यक्ष आणि आमदार भाजपचाच' अशा घोषणा देत त्यांनी राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक राजकारणाचा एकूण रोख पाहता, जठार यांचे हे दावे केवळ हवेत किल्ले बांधण्यासारखेच आहेत की काय, अशी खोचक चर्चा आता सुरू झाली आहे. कारण, त्यांच्या या घोषणांना पालकमंत्री उदय सामंत यांनी "शंभर टक्के भाजप होणार नाही, त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री आहेत," अशा कडक शब्दांत उत्तर देऊन जठार यांच्या अतिउत्साहावर थेट पाणी फेरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​वास्तविक पाहता, प्रमोद जठार हे रत्नागिरीत भाजप संघटन मजबूत करण्याचे दावे करत असले, तरी महायुतीच्या जागावाटपात आणि स्थानिक गणितांमध्ये त्यांची ही धडपड कितपत यशस्वी होणार, याबाबत खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्येच शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे जठार हे तळागाळात बैठका घेण्यात मग्न आहेत, तर दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट आणि अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. वरिष्ठ पातळीवरील या मजबूत समीकरणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय निर्णय हे जठार यांच्या दौऱ्यांवरून नव्हे, तर सामंत-फडणवीस यांच्या थेट संवादातून ठरतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे जठार यांनी कितीही दौरे केले, तरी त्याचा अंतिम निर्णय प्रक्रियेवर काहीही फरक पडणार नाही, असा सूर राजकीय वर्तुळातून उमटत आहे.

टाईम्स स्पेशल

या दौऱ्यादरम्यान जठार यांनी आमदार भैया सामंत यांची घेतलेली भेट आणि बीएलओंची घेतलेली बैठक, ही केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि वरिष्ठांना आपली सक्रियता दाखवण्यासाठी चाललेली धडपड असल्याची टीका आता दबक्या आवाजात होत आहे. रत्नागिरीत स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण करण्याचा जठार यांचा प्रयत्न हा केवळ महायुतीमधील अंतर्गत अस्वस्थता वाढवणारा ठरत असून, त्यामुळे पक्षाला ताकद मिळण्याऐवजी मित्रपक्षांमध्ये नाहक वितुष्ट निर्माण होत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आमदार प्रमोद जठार यांचे हे वाढते दौरे पक्षाला खरंच बळ देणार की त्यांचे हे केवळ 'एकतर्फी' प्रयत्न ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg