loader
Breaking News
Breaking News
Foto

​नगरपरिषदेने आदेशाला दाखवली केराची टोपली; नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी स्वखर्चाने केला रस्ता दुरुस्त

सावंतवाडी : स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दैवज्ञ गणपती मंदिर मागील बाजू, चॅपेल गल्ली जुना बाजार मार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्था अखेर स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी स्वखर्चाने दूर केली आहे. नगराध्यक्षा आणि बांधकाम अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून 'आजच्या आज' रस्ता दुरुस्त करण्याचे दिलेले आदेश नगरपरिषद बांधकाम अधिकाऱ्यांनी हवेत मिळवल्याने, शेवटी नगरसेवकालाच पुढाकार घ्यावा लागला. ​चॅपेल गल्ली जुना बाजार मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचून मोठे खड्डे पडले होते. यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी या संदर्भात बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराला कंटाळून अखेर देव्या सूर्याजी यांनी, "आजच्या आज तातडीने रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आम्ही स्वतः रस्ता करून घेऊ," असा आक्रमक पवित्रा घेतला. या इशाऱ्यानंतर बांधकाम अधिकाऱ्यांची पळापळ झाली. त्यांनी तातडीने नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, बांधकाम विभाग अभियंता तुषार सरडे आणि मनोज राऊळ यांना प्रत्यक्ष जागेवर आणले. ​जागेवर पाहणी केल्यानंतर नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले आणि तसे प्रसिद्धीपत्रकही प्रसिद्ध केले. मात्र, या आदेशाला चार दिवस उलटून गेले तरी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने साधी एक घमेली खडीही रस्त्यावर टाकली नाही. प्रशासनाने नगराध्यक्षांच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवल्याचे यावरून स्पष्ट झाले.

टाईम्स स्पेशल

​प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून, नागरिकांचा त्रास थांबवण्यासाठी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी अधिक वेळ न घालवता स्वतःच्या खिशातील पैशाने संपूर्ण रस्ता दुरुस्त करून घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि दुर्लक्षित असलेला हा रस्ता अखेर लोकप्रतिनिधीच्या तत्परतेमुळे चकाचक झाला आहे. ​यावेळी चॅपेल गल्लीतील रहिवासी शशांक प्रभू, सालू फर्नांडिस, राकेश गवंडळकर, प्रथमेश प्रभू यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. अनेक वर्षांची समस्या स्वखर्चाने मार्गी लावल्याबद्दल सर्व उपस्थित नागरिकांनी नगरसेवक देव्या सूर्याजी यांचे मनापासून आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg