दापोली (वार्ताहर) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील कृषि विस्तार शिक्षण विभागात कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांनी राजस्थानमधील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर येथून कृषिविद्या विषयातील पीएच. डी. पदवी संपादन करून आपल्या ज्ञानसाधनेचा मानाचा टप्पा गाठला आहे. “महाराष्ट्रातील कोकण विभागासाठी भात–चवळी पीक पद्धतीतील सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापन” या अत्यंत उपयुक्त आणि काळानुरूप विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. सेंद्रिय शेती, शाश्वत पीकपद्धती आणि कोकणातील कृषि विकासाच्या दृष्टीने त्यांच्या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संशोधनासाठी उदयपूर येथील राजस्थान कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. सी. चापलोट यांनी मार्गदर्शन केले, तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक तथा सध्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील संशोधन संचालक डॉ. पी.एस. बोडके यांनी सहमार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राजस्थान कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश चौधरी यांचे प्रोत्साहन, सहकार्य आणि मार्गदर्शनही मोलाचे ठरले. नाईक यांच्या संशोधनावर आधारित शोध निबंध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या कार्याला अधिक अधोरेखित मान्यता मिळाली आहे.
नाईक यांनी 1994 साली कृषि महाविद्यालय, दापोली येथून बी.एस्सी. (कृषि) पदवी प्राप्त केली आणि 1996 पासून कृषि महाविद्यालयाच्या कृषिविद्या विभागात सेवेला प्रारंभ केला. विविध पदांवर कार्य करताना त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण व प्रभावी योगदान दिले. सेवेत कार्यरत असतानाच 2018 मध्ये कृषिविद्या विषयात एम.एस्सी. (कृषि) पदवी संपादन करून त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीची नवी दिशा निश्चित केली. त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावर कार्यरत राहून त्यांनी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले, त्याचप्रमाणे कृषि विस्तार विभागाच्या संशोधन शाखेत काम करताना संशोधन प्रकल्पाची प्रश्नावली तयार करणे, माहिती संकलन आणि त्याचे सांख्यिकी विश्लेषण विश्लेषण यामध्ये उल्लेखनीय कार्य केले. विशेषतः विस्तार शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरले आहे. विद्यापीठाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी विविध माध्यमांतून मार्गदर्शन करून आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांनी बचत गटांतील तसेच ग्रामीण महिलांना फळप्रक्रिया, नाचणी प्रक्रिया आणि मसाला प्रक्रिया याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.
त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक महिलांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारत स्वतःचे व्यवसाय सुरू केले, ही त्यांच्या कार्याची मोठी सामाजिक फलश्रुती ठरली आहे. रानभाज्या व त्यांच्या पाककृती, तसेच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेवरील प्रदर्शनांद्वारे त्यांनी महिलांमध्ये कौशल्यविकास, उद्योजकता आणि आत्मविश्वास जागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे कृषि विस्तार शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाची प्रभावी जोड मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी सात शोध निबंध, तीन तांत्रिक लेख आणि शेतकऱ्यांसाठी 24 माहितीपर लेख प्रकाशित केले आहेत. दूरचित्रवाणी कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील सक्रिय सहभागातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची बहुआयामी छाप पाडली आहे. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वयाच्या पन्नाशीनंतरही नव्या ज्ञानाचा ध्यास घेत, सेवेत राहून राजस्थानसारख्या दूरस्थ ठिकाणी जाऊन पीएच. डी. पदवी संपादन करण्याचा त्यांचा प्रवास हा जिद्द, चिकाटी आणि सतत शिकत राहण्याच्या वृत्तीचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. संशोधन, शिक्षण आणि समाजाभिमुख विस्तार कार्य यांचा सुंदर संगम साधणाऱ्या शिल्पा नाईक यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.