loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी: रविवारी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; अवकाळी पाऊस आणि १०-१२ तासांच्या विलंबाने प्रवाशांचे प्रचंड हाल

​सावंतवाडी, दि. १८ मे (प्रतिनिधी): कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या तब्बल ८ ते १२ तास उशिराने धावत असल्याने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. उन्हाळी सुट्ट्या संपवून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अत्यंत त्रासदायक ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवारी दुपारपासूनच सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र, गाड्यांचा पत्ता नसल्याने प्रवाशांना तब्बल १० ते १२ तास स्थानकावरच ताटकळत राहावे लागले. त्यातच रात्रीच्या वेळी वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. पाऊस आणि उकाड्यामुळे ना प्लॅटफॉर्मवर थांबता येत होते, ना घरी परत जाता येत होते, अशी कोंडी प्रवाशांची झाली.​विशेष म्हणजे, मडगाव-LTT एक्सप्रेस तब्बल १२ तास विलंबाने धावत होती, तर कोकणकन्या एक्सप्रेसलाही तीन तास उशीर झाला होता. दुपारची २.३० ची गाडी रात्री उशिरापर्यंत न आल्याने स्थानकावर लहान मुले आणि महिलांचे मोठे हाल झाले.

टाइम्स स्पेशल

रात्री उशिरापर्यंत गाड्या न आल्याने आणि परिसरातील हॉटेल्स बंद झाल्यामुळे प्रवाशांना उपाशीपोटी रेल्वेची वाट पाहावी लागली. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. याशिवाय, रेल्वेच्या अधिकृत अ‍ॅपवर दाखवली जाणारी वेळ आणि स्थानकातील प्रत्यक्ष वेळ यामध्ये मोठी तफावत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. एका प्रवाशाने संताप व्यक्त करत सांगितले की, "दुपारी २.३० ची गाडी रात्री ९.३० ला येईल असा मेसेज आला. त्यानंतर पुन्हा वेळ बदलून रात्री १ वाजताची वेळ दाखवण्यात आली. प्रशासनाचा कोणताही ताळमेळ नाही."​स्थानकावर अडकून पडलेल्या एका महिला प्रवाशाने सांगितले की, "सोमवारी मुंबईत ऑफिस आहे, मुलांचे क्लासेस आहेत. वेळेत पोहोचणे गरजेचे असताना आम्ही अजून स्थानकावरच अडकलो आहोत. रेल्वे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहत नाहीत."या गोंधळाबाबत सावंतवाडीच्या स्टेशन मास्तरांनी माहिती दिली की, कोकणकन्या एक्स्प्रेसची सकाळी ८.३६ ची वेळ होती, ती री-शेड्युल होऊन ११.२५ ला सुटली; ज्याचा मेसेज प्रवाशांना आधीच पाठवण्यात आला होता. तर दुपारची विलंबाने चाललेली गाडी रात्री साडेबारा ते १ च्या दरम्यान स्थानकात येईल, अशी माहिती वरिष्ठांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ​दरम्यान, रेल्वेच्या या विस्कळीत वेळापत्रकामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, कोकण रेल्वे प्रशासनाच्या या कारभारावर प्रवाशांमधून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg