loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील सर्वात मोठ्या कृषी उत्सवासाठी चिपळूण सज्ज! यादव दाम्पत्याचे आयोजन, शेतकर्‍यांना अनोखी पर्वणी

चिपळूण (इकलाक खान): कोकणातील सर्वात मोठ्या कृषी, पशुधन प्रदर्शन व कृषी महोत्सवाला आज सुरुवात होत असून पुढील ५ दिवस हा महोत्सव रंगणार आहे. सकाळी ११ वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते तसेच पालकमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आम.निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, कुलगुरू संजय भावे, दुग्ध महासंघाचे संचालक अनिल हातेकर, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. या महोत्सवासाठी चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील वि.दा. सावरकर मैदान परिपूर्ण सजवण्यात आले असून येथे हुबेहूब जुने प्राचीन कोकण साकारण्यात आले आहे. तसेच सर्व जातीचे पशुधन, पाळीव जनावरे, राज्यातील व देशातील नामांकित जनावरे, मांजरी, विविध जातीचे श्वान आणि विशेष म्हणजे प्रत्यक्षात शेती आणि शेतीची प्रात्यक्षिके तसेच परिसंवाद, पंचपक्वाने असे सर्वकाही येथील प्रदर्शनात ठेवण्यात आले असून कोकणातील शेतकर्‍यांसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सहकार महर्षी सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी चिपळूण पिंपळी येथे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आणि अल्पावधीत वाशिष्ठी डेअरी प्रगतीच्या शिखरावर पोहचली. त्या माध्यमातून चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाचे हे ३ रे वर्ष असून प्रत्येक वर्षी या महोत्सवात अधिकाधिक वाढ होत राहिली आहे. यावर्षी तर तब्बल ५ एकर मैदानात महोत्सव साकारण्यात आला असून शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय तसेच कोकणातील बेरोजगार तरुण-तरुणी व महिला बचत गटांसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर मैदानाच्या सुरुवातीलाच भव्य आणि आकर्षक असे प्रवेशद्वार उभारण्यात आले असून हे प्रवेश बघताच कृषी महोत्सवाच्या भव्यतेची व प्राचीन कोकणची अनुभूती मिळत आहे. लाल मातीने सारवलेल्या भिंती आणि त्यावर प्राचीन वारलीचित्रे रंगवण्यात आली आहेत. एखाद्या जुन्या राजवाड्यात प्रवेश व्हावा असा उत्तम देखावा येथे तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्राचीन कोकणात वावरत असल्याची प्रचिती येथे येत आहे. महिला बचत गट तसेच कोकणातील खाद्यपदार्थ आणि पाककला स्पर्धा असे उत्तम नियोजन येथे करण्यात आले असून त्यासाठी देखील प्रशस्त असे दालन उभे करण्यात आले आहे. सुमारे २००हुन अधिक स्टॉल तयार करून त्याठिकानी महिला बचत गट तसेच कोकणातील तरुण तरुणींना व्यवसायाचे एक उत्तम व्यासपीठ तयार करून देण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

मैदानाच्या चारही बाजूने हुबेहूब प्राचीन कोकण साकारण्यात आले आहे. गुरांचे गावतारु गोठे, मुक्त गोठे, लोहाराचे घर, शेतात असलेले मचाण बांबूचे भव्य गेट आणि विशेष म्हणजे जुन्या काळातील खेडे गावात असलेले मातीचे घर, शेणाने सारवलेल्या भिंती आणि अंगण, त्या अंगणात तुळस, घराला बांबूचे कुंपण, मडकी घडवणारा कुंभार,असे सर्व प्रत्यक्षात हुबेहूब बघितल्यानंतर कोकणातील खेडे गावात वावरत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. हुबेहूब कोकण उभे केल्यानंतर येथे प्रत्येक जातीची जनावरे देखील ठेवण्यात आली आहेत. गाय, म्हैस, रेडे, वासरू, घोडे आणि राज्यातील व परराज्यातील नामांकित जनावरे देखील येथे दाखल होणार आहेत. कृषी क्षेत्रात पशुधनाचे महत्व आणि कृषी क्षेत्र किती प्रशस्त आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न कोकणातील शेतकर्‍यांना व भावी पिढीला मार्गदर्शन करणारा ठरणार आहे. त्याशिवाय कॅट शो, डॉग शो, पशुधन स्पर्धा या सर्व गोष्टी या कृषी महोत्सवाचे मोठे आकर्षण ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg