loader
Breaking News
Breaking News
Foto

​हत्ती व जंगली प्राण्यांच्या त्रासाविरोधात बांदा येथे महामार्गावर 'रास्ता रोको'; बागायतदार संघाचा एल्गार

सावंतवाडी (प्रतिनिधी) - हत्तींसह जंगली प्राण्यांनी शेतकरी आणि बागायतदारांची झोप उडविली आहे. रक्ताचे पाणी करून उभी केलेली बागायती डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता आरपारच्या लढाईचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, जंगली प्राण्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या ८ दिवसांत बांदा येथे महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बागायतदार संघाच्या बैठकीत घेण्यात आला. केवळ आंदोलनावर न थांबता, काजूला योग्य हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लागावेत यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शेतकरी उमेदवार उभे करण्याचा निर्णयही या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी व वेंगुर्ला येथील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बांदा येथील सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील शेती आणि बागायतीवर ओढवलेल्या संकटावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, कृषी शास्त्रज्ञ डॉ. मोहन दळवी, जिल्हा विद्युत निवारण मंचाचे अध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई, नितीन मावळंकर, नारायण गावडे, राकेश धर्णे, आकाश नरसुले, अभय नांगरे, प्रदीप सावंत, विष्णू सावंत, बॉबी उर्फ अजित देसाई, उल्हास परब, दादू उर्फ गोविंद सावंत, प्रणव नाडकर्णी, मंगलदास देसाई, अमित सावंत, राजू पवार, गोपाळ करमळकर, सज्जन नाईक यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

हत्ती व रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी येत्या ८ दिवसांत बांदा येथे महामार्गावर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून या आंदोलनाची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्याने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी संघटना आपले स्वतंत्र उमेदवार उतरवणार आहे. ​जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे बागायतदार मेटाकुटीला आला असून, आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. या निर्णयामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg