loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा; सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढल्याने बहुतांश पंप झाले 'ड्राय'

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, येथील बहुतांश पेट्रोल पंप पूर्णपणे कोरडे पडले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यातच आंब्याचा हंगाम आणि वाहतूक व्यवस्थेमुळे इंधनाची मागणी प्रचंड वाढली असताना, तेल कंपन्यांकडून वेळेवर पुरवठा होत नसल्याने ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. या समस्येची दखल घेत रत्नागिरीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी राज्यस्तरीय समन्वयक (तेल उद्योग, महाराष्ट्र) यांना तातडीने पत्र लिहून नियमित आणि पुरेसा इंधन पुरवठा करण्याची मागणी केली आहे. ​रत्नागिरी हा एक प्रमुख पर्यटन जिल्हा असल्याने दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत शाळांच्या सुट्ट्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक चारचाकी आणि इतर वाहनांनी दाखल होतात. यंदाही पर्यटकांचा ओघ मोठा आहे, ज्यामुळे इंधनाची मागणी अचानक वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत इंधनाचा पुरवठा अत्यंत नगण्य होत असल्याने गेल्या दोन आठवड्यांत जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप 'ड्राय' झाले आहेत. यामुळे अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक प्रशासनाला देखील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत रत्नागिरी सिंधुदुर्ग पेट्रोल डिलर्स असोसिएशनने देखील १६ मे २०२६ रोजी प्रशासनाकडे निवेदन देऊन आपली अडचण मांडली होती. ​या इंधन तुटवड्यामागे ऑइल कंपन्यांची नियमावली आणि वाहतुकीचे नियोजन कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. तेल कंपन्यांच्या धोरणानुसार सध्या क्रेडिट सुविधा बंद असली, तरी रोख रकमेच्या (कॅश बेसिस) व्यवहारांवरही डीलर्सना वेळेवर इंधनाचा साठा उचलून मिळत नाही. परिणामी, अनेक चालकांना आपले पंप सक्तीने बंद ठेवावे लागत आहेत. सर्वच पेट्रोल पंपांना दररोज किंवा एक दिवसाआड इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, रत्नागिरी आणि कोकण विभागासाठी नियुक्त केलेले इंधन वाहतूक करणारे टँक ट्रक्स जवळच्या डेपो भागांत स्थानिक गाड्यांना प्राधान्य दिल्यानंतरच भरले जातात. त्यामुळे कोकणात येणाऱ्या टँकर्सना इंधन भरण्यास मोठा उशीर होतो. या विलंबाचा परिणाम परतीच्या फेऱ्यांवर होऊन इंधनाचा पुरवठा विस्कळीत होत आहे.

टाईम्स स्पेशल

​ही गंभीर परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तेल कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला त्याच्या आवश्यक मागणीनुसार तातडीने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचा वाढता जोर पाहता, रविवारच्या दिवशीही इंधन डेपो चालू ठेवण्यात यावेत आणि कोकणात येणाऱ्या टँक ट्रक्सना प्राधान्याने इंधन भरून देण्यात यावे, जेणेकरून वाहतुकीतील अडथळे दूर होतील. तसेच तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालक आणि मालकांच्या नियमित संपर्कात राहून वेळेवर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. या पत्राच्या प्रती गोवा आणि रत्नागिरी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनाही योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg