loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील मुख्य सीएनजी पंप तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे कडक निर्देश

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला रत्नागिरीतील जे.के. फाईल येथील मुख्य सीएनजी पंप तात्काळ सुरू करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक आशिष प्रसाद यांना दिले आहेत. सीएनजी पंप बंद राहिल्याने शहरातील वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत असून, हा पंप त्वरित सुरू न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा थेट इशाराही प्रशासनाने दिला आहे. एका गंभीर सुरक्षा प्रकरणानंतर हा पंप बंद करण्यात आला होता, मात्र आता त्याला ६ दिवस उलटूनही तो सुरू न झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी हे आक्रमक पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी जे.के. फाईल सीएनजी पंपावर काही अज्ञात व्यक्तींनी येऊन तेथील कर्मचारी आणि व्यवस्थापकांना विनाकारण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती, तसेच त्यांना दमदाटी करून शारीरिक मारहाणही केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या बहुतांश कर्मचार्‍यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने काम सोडून दिले. त्यामुळे पंपाचे कामकाज पूर्णपणे कोलमडले. या पार्श्वभूमीवर, पंपाचे मॅनेजर रोशन भोईर यांनी नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे आणि त्यांच्या सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी १२ मे २०२६ पासून काही दिवस पंपाचे कामकाज तात्पुरते बंद ठेवत असल्याचे प्रशासनाला कळवले होते. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून जे.के. फाईल येथील सीएनजी पंपाला २४ तास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. प्रशासनाने सुरक्षेची पूर्ण हमी दिली असताना आणि पंपाचे कामकाज बंद होऊन जवळपास सहा दिवस उलटले असूनही अद्याप नवीन कर्मचार्‍यांची भरती करून पंप सुरू करण्यात आलेला नाही.

टाईम्स स्पेशल

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने वाहनचालकांचा सीएनजी भरण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. जे.के. फाईल येथील हा सीएनजी पंप शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, इतर पंपांच्या तुलनेत येथून मोठ्या प्रमाणावर सीएनजीचा पुरवठा केला जातो. तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही सीएनजीची तीव्र गरज भासत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, हा पंप तात्काळ सुरू करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनालाही सदर पंपावर २४ तास २ पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याचे आणि गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महानगर गॅस प्रशासन हा पंप कधी सुरू करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg