loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरतमधील अनेक उद्योगांची परिस्थिती गंभीर सिलिंडर तुटवड्यामुळे कामगार गावाकडे चालले

सुरत : सुरतच्या उधना रेल्वे स्थानकावर रविवारी हजारो स्थलांतरित कामगारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. हे सगळे कामगार रेल्वेनं आपापल्या गावी परतण्यासाठी जमले होते. गर्दीमुळं परिस्थिती एवढी बिघडली की पोलिसांना ‘सौम्य’ लाठीचार्जही करावा लागला. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात उधना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झालेली दिसत असून मोठा अपघात थोडक्यात टळल्याचंही पाहायला मिळत आहे. मध्य पूर्वेतील युद्धाच्या परिणामामुळं सुरतमधील अनेक उद्योगांची परिस्थिती सध्या गंभीर आहे. तसंच कामगारांना एलपीजी सिलिंडर अधिक दरानं खरेदी करावे लागत आहे, असं काही प्रवाशांनी सांगितले. या संपूर्ण परिस्थितीमुळं हजारो मजूर आर्थिक अडचणीत सापडल्यानं ते सुरत सोडून त्यांच्या गावी परत जात असल्याचं चित्र आहे. या घटनेनंतर रेल्वे व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचं कारण म्हणजे, दरवर्षी सणासुदीच्या काळात उधना स्टेशनवर प्रचंड गर्दी असते आणि प्रवाशांना तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवारी सकाळी हजारो प्रवासी या रेल्वे स्थानकावर बिहारला जाणार्‍या विशेष ट्रेनची वाट पाहत होते. त्यावेळी अचानक गोंधळ उडाला. प्रचंड उकाडा आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे काही जण बेशुद्ध पडल्याचं सांगण्यात येतंय. यात महिलांचा समावेश असल्याचंही म्हटलं गेलं. याठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा नसल्याच्या तक्रारीही होत्या. एकीकडे शाळांना सुट्‌ट्या आणि दुसरीकडं काही ठिकाणी काम कमी झाल्यानं कामगारांना कुटुंबासह गावी परत जाण्याचा मार्ग अवलंबावा लागत आहे. मुकेश कुमार नावाचा एक कामगार म्हणाला, मी सुरतच्या एका कापड कंपनीत काम करत होतो. पण आता काम मिळणं बंद झालं आणि त्यात गॅस सिलिंडर तिप्पट दरानं मिळत आहे. त्यामुळं मी बिहारला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, याठिकाणी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणण्यात आली. काही लोकांनी बॅरिकेड ओलांडून ट्रेनच्या दिशेने धाव घेतल्यानं पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याचं सांगण्यात आलं. सुरत रेल्वे पोलीस म्हणाले, रविवारी अंदाजे २० ते २२ हजार प्रवासी गावी जाण्यासाठी या स्थानकावरून रेल्वेत बसले.

टाइम्स स्पेशल

तरीही सुमारे ५ ते ७ हजार लोक शिल्लक राहिले. काही अतिरिक्त विशेष रेल्वे चालवूनही ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. तरी ५ मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. हिरे आणि वस्त्रोद्योगांसाठी ओळखलं जाणारं सुरत शहर स्थलांतरित कामगारांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. एका अंदाजानुसार, याठिकाणी ४२ लाखांहून अधिक स्थलांतरित कामगार राहतात. शहराच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा ५८ टक्के आहे. सुरतमधील बिहार विकास परिषदेचे अध्यक्ष धर्मेश सिंह यांनी सांगितलं, ही अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. आम्ही रेल्वे मंत्रालयाला अनेक वेळा पत्रं लिहिली आहेत. सध्या विशेष गाड्यांची व्यवस्था आहे, पण आम्हाला नियमित गाड्या हव्यात. या लोकांना मजुरच समजलं जातं. रेल्वे मंत्रालय ज्या गतीनं वंदे भारतसारख्या प्रीमियम गाड्यांची संख्या वाढवत आहे, त्या गतीनं सामान्य तिकीट असलेल्या गाड्यांमधील सुविधा वाढवल्या जात नसल्याचंही सांगितलं जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg