loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा शुभदादेवी भोंसले यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. ​याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांचा विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना काकतकर यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, "जिल्ह्यात जेव्हा जेव्हा विज्ञान स्पर्धा किंवा कार्यक्रम आयोजित केले जातात, तेव्हा 'एसपीके' महाविद्यालयाचे प्राध्यापक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य करतात, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​संस्थेचे संचालक प्रा. डी.टी. देसाई यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यावर भर दिला. "आजच्या युगात संगणक आणि तंत्रज्ञानाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे भारत महासत्ता बनत असून विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे," असे आवाहन त्यांनी केले. ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल यांनी विज्ञान प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली आणि भविष्यात विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होईल, यावर प्रकाश टाकला. ​प्रास्ताविक डॉ. व्ही.पी. सोनाळकर, सूत्रसंचालन डॉ. जी.एस. मर्गज आणि ​आभार प्रा. व्ही.पी. राठोड यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्याला संस्थेचे सहसंचालक अ‍ॅड. शामराव सावंत, कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​हे विज्ञान प्रदर्शन शनिवार, १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. सावंतवाडी परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg