loader
Breaking News
Breaking News
Foto

सावधान! विकासाच्या ‘झोन’चे आमिष दाखवून जमिनी लाटण्याचा नवा डाव; दलालांचा सुळसुळाट

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यात सध्या जमिनी लाटण्याचा एक नवा आणि भयानक डाव आखला जात असल्याचे समोर येत आहे. विकासाचा झोन येणार असून शासन तुमच्या जमिनी संपादित करणार आहे, अशी भीती घालून स्थानिक शेतकरी आणि बागायतदारांकडून त्यांच्या मोक्याच्या जमिनी कवडीमोलाने पदरात पाडून घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. काही वर्षांपूर्वी ‘वन संज्ञा’ नोंद असलेल्या जमिनी वन विभागाच्या ताब्यात जाणार असल्याची भीती दाखवून धनदांडग्यांनी स्थानिकांच्या जमिनी स्वस्तात लाटल्या होत्या. आता तोच प्रकार पुन्हा एकदा नव्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. तुमची जमीन डेव्हलपमेंट झोनमध्ये जाणार आहे, त्यापेक्षा आताच विकलेली बरी, असा खोटा प्रचार करून दलाल आणि परप्रांतीय गुंतवणूकदार सक्रिय झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीनही तालुक्यांच्या सीमेजवळ आहे. यामुळे या भागातील जमिनींना ’सोन्याचा भाव’ आला आहे. विशेषतः वेंगुर्ले समुद्रकिनार्‍यालगतच्या जमिनींना मोठी मागणी असून तिथे रिसॉर्ट आणि पर्यटनाच्या नावाखाली जमिनी खरेदी केल्या जात आहेत. सावंतवाडी: मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या आणि मोक्याच्या ठिकाणच्या जमिनींवर दिल्लीतील बड्या गुंतवणूकदारांची नजर आहे. दोडामार्ग: या तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात जमिनींचे व्यवहार होत असून येथील नैसर्गिक वनसंपदा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टाईम्स स्पेशल

गावोगावी फिरणारे एजंट सध्या शेतकरी आणि बागायतदारांच्या मागावर आहेत. समाईक जमिनी आणि कुळ कायद्यातील जमिनींच्या वादाचा फायदा घेऊन त्या लाटण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक स्थानिक शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी सध्या न्यायालयाच्या चकरा मारत आहेत. जिथे रिकाम्या जागा आहेत, त्या शोधून काढल्या जात आहेत. तिथे जाणीवपूर्वक विकास झोन येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, जेणेकरून घाबरलेला शेतकरी कमी किंमतीत जमीन विकण्यास तयार होईल. मोपा विमानतळ आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे जमिनीचे भाव भविष्यात आणखी वाढणार आहेत. त्यामुळे बाहेरील दलालांच्या थापांना बळी पडू नका. जमिनीचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्याशिवाय किंवा शासनाच्या अधिकृत घोषणांची शहानिशा केल्याशिवाय आपल्या वडिलोपार्जित जमिनीची विक्री करू नका, असे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg