loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी बाजारपेठेत कर्नाटक पासिंग कारमधील तरुणांचा धुमाकूळ

साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : साटेली-भेडशी बाजारपेठेत एका स्थानिक व्यक्तीला मारहाण करून, पोलीस चेकपोस्टचे बॅरिकेड्स तोडून पलायन करणाऱ्या कर्नाटक पासिंग कारमधील युवकांना दोडामार्ग पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. दोडामार्ग पोलीस आणि स्थानिक युवकांनी सुमारे 40-50 किलोमीटर पाठलाग करून या मुजोर पर्यटकांना चंदगड तालुक्यातील आंबेवाडी धरण परिसरात पकडले. या कारवाईमुळे पर्यटकांच्या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, कोणाळकट्टा येथील रहिवासी प्रकाश कर्पे साटेली-भेडशी बाजारपेठेत आले होते. यावेळी केए 05 एन इ 7755 या क्रमांकाच्या कारमधील युवकांनी आपली गाडी प्रकाश कर्पे यांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. "गाडी अंगावर का घातली?" अशी विचारणा कर्पे यांनी केली असता, गाडीतून उतरलेल्या युवकांनी त्यांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. बाजारपेठेत भरदिवसा सुरू असलेला हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक जमा होऊ लागताच, युवकांनी कार घेऊन तिथून तिलारीच्या दिशेने वेगाने पळ काढला. स्थानिकांनी वीजघर चेकपोस्टवर फोन करून या बाबतची माहिती दिली. मात्र, सदर युवकांनी कमालीची मुजोरी दाखवत वीजघर-केंद्रे येथील पोलीस चेकपोस्टवर लावलेले बॅरिकेड्स जोरात धडक देऊन तोडले आणि कार तिलारी घाटाच्या दिशेने पळवली. सरकारी मालमत्तेचे नुकसान करून आणि पोलिसांना न जुमानता पळाल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले.

टाइम्स स्पेशल

घटनेचे गांभीर्य ओळखून दोडामार्ग पोलीस पथक आणि साटेली -कोनाळकट्टा परिसरातील काही जागरूक युवक आपापल्या वाहनांनी या कारच्या पाठलागावर निघाले. तिलारी घाटातील वळणावळणाच्या रस्त्याचा फायदा घेत पळणाऱ्या या कारला अखेर चंदगड जवळील आंबेवाडी धरण परिसरात पोलिसांनी आणि पाठलाग करणाऱ्या युवकांनी घेराव घातला. चौफेर कोंडी झाल्याने आरोपींना शरणागती पत्करावी लागली. पकडण्यात आलेले सर्व युवक सध्या दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस प्रशासन आणि मदतीला धावलेल्या स्थानिक युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोनाळकट्टा येथील व्यक्तीला मारहाण करून पोलीस बॅरिकेड्स तोडून पसार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg