loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना राज्यस्तरीय 'दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर' स्मृती पुरस्कार जाहीर

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाने ठसा उमटवणारे संगमेश्वरचे ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना २०२६ सालचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय 'दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती मराठी पत्रकार पुरस्कार' जाहीर झाला आहे. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संस्थेच्या वतीने त्यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा आणि साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. कोणतीही शिफारस नसताना केवळ कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर झाल्याने संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जे. डी.पराडकर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक 'रत्नागिरी टाईम्स'मधून केली आहे. त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास अत्यंत ध्येयनिष्ठ राहिला आहे. विशेषतः कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी समाजमनाला उभारी देण्यासाठी सलग १०० दिवस १०० लेख लिहिण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांच्या या कार्याची दखल केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अभ्यास दौऱ्यांमध्येही घेण्यात आली आहे. पत्रकारितेसोबतच साहित्य क्षेत्रातही पराडकर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पुणे येथील चपराक प्रकाशनातर्फे त्यांची आतापर्यंत १३ पुस्तके प्रकाशित झाली असून, एकूण १४ पुस्तके वाचकांच्या भेटीला आली आहेत. सातारा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची दोन नवीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'अक्षरयात्रा' या गाजलेल्या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार' प्राप्त झाला आहे. याशिवाय त्यांना आजवर अनेक राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, तंटामुक्ती अभियानातही त्यांनी विभाग स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला आहे.

टाइम्स स्पेशल

पत्रकारितेचे व्रत सांभाळताना जे. डी.पराडकर यांनी नेहमीच साधेपणा जपला आहे. त्यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि निस्पृह लेखणीतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. 'ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल'ने आपल्या २० व्या वर्षात पराडकर यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तिमत्त्वाची निवड करून या पुरस्काराची उंची वाढवली आहे, अशा भावना त्यांचे मित्र आणि सहकारी यासीन पटेल यांनी व्यक्त केल्या आहेत. हा पुरस्कार म्हणजे पराडकर यांच्या निष्कलंक पत्रकारितेचा आणि समृद्ध साहित्यसेवेचा यथोचित गौरव असल्याचे मानले जात आहे. या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg