loader
Breaking News
Breaking News
Foto

आभा कार्ड सक्तीमुळे शिक्षण कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले प्रलंबित

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून शाळेतील कर्मचारी यांची वैद्यकीय बिले आभा कार्ड सक्तीमुळे दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आजारपणात उपचार करून वैद्यकीय खर्च केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण कायम आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन वैद्यकीय बिले नियमित मंजूर होत असताना, फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही सक्ती का? असा थेट सवाल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने उपस्थित केला आहे. दरम्यान, या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे आणि राज्य फेडरेशन प्रतिनिधी अशोक गीते यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित वैद्यकीय बिले तातडीने मंजूर करावीत,आजारपणात खर्च केलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, आभा कार्ड सक्तीमुळे निर्माण झालेला गोंधळ त्वरित दूर करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत विभागाने विभागीय उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथील पुढील मार्गदर्शन मागवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्य सरकारने आभा कार्डच्या अधीन राहून पाच लाखांपर्यंत विविध आजारांचे उपचार कव्हर केले आहेत. याचा अप्रत्यक्ष अर्थ असा लावला जात आहे की रुग्णालयात जाऊन आभा कार्डवरच उपचार घेणे बंधनकारक आहे, अन्यथा पुढे पाच लाखांपर्यंतची वैद्यकीय बिले शासनाकडे सादर करता येणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी केवळ कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या काही तालुक्यांमध्येच आभा कार्डवर उपचार करणारी नोंदणीकृत रुग्णालये उपलब्ध आहेत. उर्वरित तालुके आणि ग्रामीण भागात वास्तव्यास असलेले कर्मचारी आजारी पडल्यास प्रथम नोंदणीकृत रुग्णालय शोधा,त्यानंतर तेथे उपचारासाठी प्रवास करा आणि दरम्यानचा खर्च स्वतःच्या खिशातून करा अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

टाइम्स स्पेशल

“उपचार हवे तर प्रवास करा आणि जीवन वाचवायचे असेल तर खर्च स्वतः करा, हीच नवी धोरणात्मक दिशा आहे का?” असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे म्हणणे आहे. शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवून विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून मागवलेल्या मार्गदर्शन पत्राची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिली आहे. या अनुषंगाने संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे भेट देऊन सविस्तर चर्चा करणार असून प्रलंबित वैद्यकीय बिलांचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहीती सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सचिव विजय मयेकर यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाकडून नाराजी व्यक्त

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg