loader
Breaking News
Breaking News
Foto

काजुर्ली–खडपे वाडीमध्ये रस्ता नसल्याने आजारी वृद्धांना कावडीवरून वाहून नेण्याची वेळ; प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील काजुर्ली–खडपे वाडी येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर तुटला असून, मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये वेगळी भूमिका घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत.“विकास फक्त कागदावर आणि घोषणा मंचावरच दिसते, प्रत्यक्षात मात्र आमचं जगणं अजूनही अंधारात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.खडपे वाडीमध्ये आजही घरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, वृद्धांना दवाखान्यात पोहोचवणे आणि आजारी रुग्णांवर वेळेवर उपचार करणे हे सगळेच मोठे आव्हान बनले आहे. अलीकडेच आजारी वृद्धाला उपचारासाठी नेताना ग्रामस्थांना कावडीचा आधार घ्यावा लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे या वाडीतील विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तर दूरच, साधे चारचाकी वाहनही घरापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसून, शारीरिक त्रासासोबत मानसिक तणावही सहन करावा लागत आहे. “निवडणुकांच्या वेळी मतांसाठी हात जोडणारे पुढारी निवडणूक संपताच या वाडीकडे पाठ फिरवतात,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर अर्ज, निवेदने व पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ‘आता फक्त आश्वासनांवर विश्वास ठेवायचा नाही’ असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

टाइम्स स्पेशल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची लगबग सुरू असताना, “आधी आमच्या वाडीत येऊन परिस्थिती पाहा, रस्त्यावर चालून दाखवा, मगच विकासाच्या गप्पा मारा,” अशी थेट मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तात्काळ रस्ता सुविधा मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काजुर्ली–खडपे वाडीतील हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नसून, तो गुहागर तालुक्यातील दुर्लक्षित ग्रामीण विकासाचं जिवंत उदाहरण आहे. आता तरी जबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाची दखल घेणार का, की पुढील निवडणुकीपर्यंत हा प्रश्न पुन्हा विस्मरणात जाणार हा सवाल ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg