loader
Breaking News
Breaking News
Foto

“सत्तेपेक्षा नातं मोठं… पंधरागाव धामणंदमध्ये रामदास भाईंच्या जुन्या सहकार्यांची गळाभेट

खेड (प्रतिनिधी) - राजकारणात मतदारसंघ बदलतात, सीमारेषा बदलतात, आकडे बदलतात… मात्र माणसांमाणसांतील नातं आणि विश्वास मात्र कधीच बदलत नाही, याचा प्रत्यय पंधरागाव धामणंद पट्ट्यात पुन्हा एकदा आला. 2008 मध्ये खेड विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. खेड तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गट खेड विधानसभा मतदारसंघात, तर उर्वरित साडेतीन गट दापोली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाले. मात्र या सगळ्या प्रशासकीय बदलांपूर्वी, अत्यंत दुर्गम आणि दुर्लक्षित असलेल्या पंधरागाव धामणंद पट्ट्याला विकासाची दिशा देण्याचे काम शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी मनापासून केले होते. आज हा विभाग गुहागर विधानसभा मतदारसंघात असला, तरी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने रामदास भाई या विभागात आले आणि केवळ प्रचार नव्हे, तर आपल्या आयुष्याचा मोठा भाग असलेल्या लोकांना भेटण्यासाठीच हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“माझ्या राजकीय प्रवासात सर्वाधिक प्रेम, विश्वास आणि ताकद मला याच धामणंदच्या लोकांकडून मिळाली. आज मी इथे आलोय, कारण ही माणसं माझ्या मनात आहेत,” असे बोलताना रामदास भाईंचा आवाज भरून आला. सभा संपल्यानंतर आणि सभेपूर्वी, 1990 च्या दशकापासून रामदास भाईंसोबत सावलीसारखे उभे राहिलेले वयोवृद्ध कार्यकर्ते, जुने सहकारी त्यांच्या भेटीसाठी पुढे आले. कोणी हात धरून उभा राहिला, कोणी मिठी मारून डोळे पुसले. “एवढा मोठा नेता आजही आमची आठवण ठेवतो, आमचं नाव घेतो,” या भावनेने अनेकांचे डोळे पाणावले. रामदास भाई देखील जुन्या आठवणींमध्ये हरवले. गावागावात केलेल्या कामांची, संघर्षाची, रस्ते-पाणी-वीज या मूलभूत प्रश्नांसाठी लढलेल्या दिवसांची उजळणी झाली. निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुने ऋणानुबंध जिवंत झाले.

टाइम्स स्पेशल

सध्या या मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव असले, तरी रामदास भाईंनी या भागात केलेल्या विकासकामांची जाणीव आजही लोकांच्या मनात ताजी आहे. भेटीदरम्यान ग्रामस्थांनी थेट शब्दांत सांगितले की, “तुम्ही केलेला विकास आम्ही विसरलेलो नाही.” या भावनिक वातावरणात धामणंद विभागातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी, रामदास भाईंच्या माध्यमातून शिवसेनेकडून उभ्या असलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करू,” असा ठाम शब्द रामदास भाईंना दिला. विशेष म्हणजे, पंधरा वर्षांचा काळ लोटूनही रामदास भाई आपल्या जुन्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नावाने हाक मारत, प्रेमाने मिठी मारत होते. ही केवळ स्मरणशक्ती नव्हे, तर सर्वसामान्य माणसाशी जोडलेलं मन आणि नात्याची वीण होती, जी राजकारणाच्या पलीकडे जाणारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg