loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी यांचा पारंपारिक भेट सोहळा मोठ्या उत्साहात

मालवण (प्रतिनिधी) - कांदळगाव येथील देव रामेश्वर आणि पंचायतनने काल शिवकालीन परंपरेनुसार किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि आदी माया श्री देवी भवानी यांची भेट घेतल्यानंतर रात्रभर मालवण मेढा येथील मौनीनाथ मंदिरात मुक्काम करून श्री देव रामेश्वराने आज सकाळी मेढा भागातील शिवकालीन कुशे वाड्याला भेट देत भाविकांना आशिर्वचन दिले. तर दुपारी श्री देव रामेश्वराने आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह मालवण बाजारपेठेतील रामेश्वर मांडलाही भेट दिली. कांदळगाव येथील श्री देव रामेश्वराचा सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी यांच्याशी होणारा पारंपारिक भेट सोहळा काल मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री देव रामेश्वराने किल्ला भेटी नंतर सायंकाळी दांडी येथे श्री देव दांडेश्वराची भेट घेऊन मेढा, राजकोट येथील मौनीनाथ मंदिर गाठले. त्याठिकाणी भाविकांना दर्शन देतानाच रात्री वास्तव्य करत विश्रांती घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मेढा येथील बालगोपाळ मंडळातर्फे रामेश्वराची पूजा अर्चा करण्यात आली तसेच भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे, गार्गी कुशे आदीसह नागरिक व भाविक उपस्थित होते. श्री देव रामेश्वराने मौनीनाथ मंदिर येथून मेढा येथीलच ऐतिहासिक कुशे वाडा येथे भेट दिली. त्यावेळी कुशे कुटुंबियांकडून रामेश्वराचे स्वागत व पूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश कुशे व इतर उपस्थित होते. त्यानंतर श्री देव रामेश्वर पुन्हा वाजत गाजत आपल्या लवाजम्यासह मालवण सोमवार पेठ येथील रामेश्वर मांडाकडे निघाला. त्यावेळी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगरध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, महेश कांदळगावकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, बाळू अंधारी, मोहन वराडकर, राजा गावकर, परशुराम पाटकर, दिलीप वायंगणकर, गणेश प्रभूलकर, छोटू तारी आदी व इतर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी देवांच्या स्वागतासाठी मेढा ते रामेश्वर मांड रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक सडे व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मेढा येथे दोन पिंपळ महापुरुष विकास मंडळाच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मेढा रामगल्ली येथील महिलांकडून शीतपेय वाटप करण्यात आले. नागरिकांनी रामेश्वराचे स्वागत करत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तर दैवज्ञ भवन येथे दैवज्ञ हितवर्धक समाजातर्फे रामेश्वराचे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करून पूजन करण्यात आले. दुपारी सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांड येथे श्री देव रामेश्वर दाखल झाल्यावर रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या वतीने पालखी व देव तरंगांचे पूजन करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या सर्व भेटी गाठीनंतर सायंकाळी श्री देव रामेश्वर आपल्या लवाजम्यासह कोळंब गावच्या दिशेने रवाना झाला. कोळंब मांगरी येथील श्री देव महापुरुष देवस्थान येथे रात्री पालखी तरंग यांचे आगमन झाल्यानंतर त्याठिकाणी विसर्जन आणि मुक्काम करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg