loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत पोलिसांचे चातुर्य,संयम,पराकोटीची चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच श्रीराम मंदिरातील सीतामाईचे मंगळसूत्र जसेच्या तसे परत मिळाले!

रत्नागिरी - रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिराच्या गर्भगृहातील देवी सीतेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आणि जणू सारे रत्नागिरी शहर सुन्न झाले. सीतेच्या गळ्यातील मंगळसूत्र हा सर्वांच्याच भावनेचा प्रश्‍न होता. कोणत्याही स्थितीत चोरटा जेरबंद झालाच पाहिजे आणि सीतेचे मंगळसूत्र देखील परत मिळाले पाहिजे अशीच सर्व भाविकांची एकमुखी भावना होती.. रत्नागिरीच्या पोलिस अधिकार्‍यांना याची पुरेपुर कल्पना होती म्हणूनच त्यांनी पराकोटीचे परिश्रम घेतले आणि सर्व चोरटे जेरबंद झाले व मंगळसूत्र देखील जसेच्या तसे परत मिळाले! रत्नागिरीच्या श्रीराम मंदिराचे गर्भगृहात भर दिवसाढवळ्या सीतेच्या मंगळसूत्राची चोरी झाली. चोरट्याने देवी सीतेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात रेकॉर्ड झाले होते. ही चोरी दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२४ ला घडली. त्यानंतर काही वेळाने ती मंदिरातील पुरोहितांच्या ध्यानी आली तेव्हा धावाधाव झाली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले तेव्हा सकाळी ७.२४ वाजता चोरटा सीतेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळाल्याचे दिसून आले. त्यामध्ये चोरट्याचा चेहरा अत्यंत व्यवस्थितरित्या दिसून येत होता. त्याचवेळी मंदिराच्या हॉलमधील घंटा वाजली त्याचा आवाज त्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला. परंतु घंटा वाजविणारा मात्र दिसून येत नव्हता. चोरी झाल्याचे निदर्शनास येताच रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच पोलिस अधिकार्‍यांनी विलक्षण चपळाईने चोरट्याचा शोध घेण्यास प्रारंभ केला. केवळ तासाभरात त्यांनी चोरट्याची ओळख पटविली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा तो चोरटा कोण? तो कुठे राहणारा आहे? आणि त्याचे रेकॉर्ड काय? हे सर्व त्यांनी शोधून काढले आणि मग लगोलग रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक चोरट्याला पकडण्यासाठी त्याच्या गावाला रवाना झाले. पोलिसांनी हे इतके पटापट केले की बोलता सोय नाही. सीसीटीव्हीमध्ये मंगळसूत्र खेचणारा एकच चोरटा दिसत होता परंतु त्याचे आणखी ३ साथीदार होते व ते कार घेऊन चोरी करण्यास आले होते हे पोलिसांनी केवळ तासाभरात शोधून काढले. मंदिरातील मंडळींना याची कल्पनाही नव्हती. पोलिसांनी त्याच दिवशी रात्री त्यांनी चोरीसाठी आणलेली गाडी जप्त केली व दोघांना जेरबंद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळसूत्र खेचणारा मुख्य सूत्रधार गोदीलवाडी, मौजे पलूस, जि. सांगली येथील राहणारा होता. त्याचे नाव होते अक्षय मोरे. त्याला संभाजी जाधव या दुसर्‍या चोरट्याने सहाय्य केले. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना गाडीसह त्याच दिवशी अटक केली होती मात्र दोघे मुख्य चोरटे फरारी झाले. ते आपल्या गावी जातील हे ध्यानी घेऊन पोलिस पथक धावपळ करीत पाठोपाठ त्यांच्या गावी दाखल झाले. परंतु मुख्य चोरटा अक्षय मोरे निर्ढावलेला व सराईत चोर असल्याने तो घरी न जाता परस्पर परागंदा झाला. त्याला पकडण्यासाठी रत्नागिरी पोलिसांची दोन पथके जावून दाखल झाली. त्यांनी सुमारे आठवडाभर तेथे ठाण मांडून चोरट्यांची बारकाईने माहिती जमा केली. मंगळसूत्र खेचणारा अक्षय मोरे याच्या २ बायका आहेत. त्याची पहिली बायको त्याच्या आई वडिलांसोबत राहते मात्र तो त्याच्या दुसर्‍या बायकोला भेटायला जात असे. पोलिसांनी ही माहिती काढली आणि पोलिसांनी तेथे अहोरात्र पाळत ठेवली.. आज ना उद्या तो तिथे येईल.. दिवसा येईल किंवा रात्री येईल याचा विचार करुन अनेक दिवस पोलिसांनी पाळत ठेवली.

टाइम्स स्पेशल

मुख्य चोरटा अक्षय मोरे हा सराईत चोरटा असल्याने पोलिसांच्या कार्य पध्दतीची त्याला पुरेपूर माहिती होती. पोलिस कसा शोध घेतील हे तो जाणत होता. म्हणून रत्नागिरीतून चोरी करुन निघाल्यावर त्याने आपले मोबाईल वापरणे बंद केले. त्यामुळे पोलिसांना त्याचा मागमूस मिळेना. रत्नागिरीतून बाहेर पडल्यावर तो आपल्या घरी गेलाच नाही तर तो उत्तर प्रदेश व अन्य परप्रांतात भटकत राहिला.. कधीही एका जागी स्थिर राहत नसे.. त्यामुळे पोलिसांना अतोनात सायास पडले. चोरटा अक्षय मोरे याच्या दोन्ही बायकांच्या घराभोवती पोलिसांची अहोरात्र पाळत असे. एकदा पोलिसांचा डोळा चुकवून दुसर्‍या बायकोला भेटण्यासाठी तो आला आणि ५ मिनिटात नाहीसा झाला. केवळ ५ मिनिटांसाठी चुकामूक झाली. परंतु रत्नागिरीचे पोलिस जिद्द हरले नाहीत.. त्यांनी चिकाटी दाखविली, अविश्रांत मेहनत घेतली, संयम पाळला व त्याला कोणत्याही स्थितीत जेरबंद करायचे या निर्धाराने ते वागत होते. पोलिस त्याचा मागमूस लागावा यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करीत होते. तो दुसर्‍या बायकोला अधून मधून फोन करीत असे त्याचाही शोध पोलिसांनी घेतला. परंतु दुसर्‍या बायकोजवळ स्वत:चा मोबाईल नव्हता तर एखाद्या परिचिताच्या मोबाईलवर फोन करुन तो बायकोला फोनवर बोलवून घेत असे. अशा स्थितीत पोलिसांना एक दुवा सापडला. तो एका परिचित गृहस्थांना फोन करुन केव्हातरी गावाबाहेर भेटायला बोलवत असे. पोलिसांना हे समजताच पोलिसांनी चौफेर फिल्डींग लावली. रत्नागिरीच्या पोलिसांनी गोड बोलून त्या गृहस्थांना विश्‍वासात घेतले तेव्हा त्यांनी पोलिसांना मदत करण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर अक्षय मोरेचा त्या गृहस्थाना फोन आला आणि त्याने त्यांना रेल्वे फाटकाच्या पलिकडे भेटायला बोलावले. त्या गृहस्थाने पोलिस पथकाला तशी खबर दिली व तो अक्षय मोरेला भेटण्यासाठी रवाना झाला. खबर मिळताच रत्नागिरीचे पोलिस पथक देखील धावत पळत निघाले. रेल्वे फाटकाच्या पलिकडे अक्षय मोरेला भेटण्यासाठी तो गृहस्थ गेला व पोलिस पाठोपाठ रेल्वे फाटकाच्या अलिकडे जावून थडकले होते. चालून आलेले सावज निसटू नये या हेतूने त्या गृहस्थाने अक्षय मोरेला मिठी मारली.. पोलिस पथक येईपर्यंत त्याला थांबवून ठेवण्याचा त्यांचा उद्देश होता.. परंतु अक्षय मोरे हा भलताच चलाख असल्याने त्याने रागरंग ओळखला व रेड्याच्या ताकदीने हिसडा मारुन तो निसटला आणि गल्ली बोळातून पळत नाहीसा झाला. इतक्या दिवसांची मेहनत पुन्हा एकदा फुकट गेली होती. परंतु तरीही रत्नागिरीची पोलिस पथके हार मानायला तयार नव्हती. चोरटा किती बिलंदर असला तरी आज ना उद्या त्याला जेरबंद करणारच असा रत्नागिरीच्या पोलिसांना आत्मविश्‍वास होता. असाच अधून मधून लपाछपीचा खेळ रंगत असे. चोरटा १२ गावचे पाणी प्यायलेला असल्याने भयंकर बिलंदर होता. त्याच्या नावावर महाराष्ट्रात अनेक चोर्‍या दाखल आहेत. आजवर अनेक चोर्‍या त्याने पचवल्या असून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटत राहिला आणि पुन्हा पुन्हा चोर्‍या करीत राहिला. परंतु रत्नागिरीचे पोलिस पथक विलक्षण चिकाटीने वागले.. आज ना उद्या त्याला हातकड्या घालायच्या या निर्धाराने सारे उभे ठाकले होते.. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात होती. कारसोबत पकडण्यात आलेल्या दोघा साथीदारांपैकी एकाचा थोरला भाऊ एका राजकीय पक्षाचा मोठा नेता होता. आपला भाऊ नाहक अडकला याचा तो चोरट्याच्या कुटुंबाला दोष देत असे. पोलिसांनी मामला गोडीगुलाबीने घेतला. त्याच्या कडूनही सुगावा लागतो का यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली. चोरट्याच्या सर्व नातेवाईकांचा शोध घेण्यात आला.. चोरटा त्यांच्या संपर्कात आहे का? याचा तलाश घेतला गेला. परंतु तो अट्टल चोरटा इतका सराईत होता की कुणा नातेवाईकांच्या संपर्कात राहिला नसल्याने दिसून आले. अशा स्थितीत रत्नागिरीचे पोलिस कसा सुगावा काढता येईल यासाठी विविध मार्ग शोधत होते. अचानक खबर मिळाली की दोघे चोरटे चोरीची भांडी व सोन्याचे दागिने विकण्यासाठी सांगलीतील फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार आहेत. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता सापळा रचला. इतक्यात दोघेजण गोणपाटातून काही वस्तू घेऊन तेथे आले. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले तेव्हा ते दोघे अट्टल चोरटे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याजवळ काही किलो वजनाचे चांदीचे दागिने होते तर अक्षय मोरे याच्या खिशात मंगळसूत्र व सोन्याचा आणखी एक दागिना सापडला. पोलिस पथकाने त्वरीत रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरातून चोरीला गेलेल्या मंगळसूत्राचा फोटो मागवून घेतला.. फोटोनुसार ते चोरीला गेलेले मंगळसूत्र असल्याचे स्पष्ट झाले.. वजनही तंतोतंत जुळले.. कस लावून पाहण्यात आला तेव्हा ते सोन्याचे असल्याचे स्पष्ट झाले.. आणि मग त्या दोघा अट्टल चोरट्यांना हातकड्या घालण्यात आल्या. ते अट्टल चोरटे म्हणजेच देवी सीतामाईचे मंगळसूत्र खेचून पोबारा करणारा अक्षय मोरे व त्याचा साथीदार संदीप जाधव हे होय. चोरट्यांना सांगलीच्या हद्दीत ताब्यात घेण्यात आल्याने त्यांना रत्नागिरीला आणण्याकरिता सांगली येथील न्यायालयाची रितसर परवानगी घेण्यात आली व मग पोलिस पथक त्या अट्टल चोरट्यांना घेऊन रत्नागिरीत दाखल झाले. सीतामाईचे चोरीला गेलेले मंगळसूत्र देखील आणण्यात आले असून न्यायालयीन बाबींची पूर्तता होताच ते श्रीराम मंदिर संस्थेच्या ताब्यात देण्यात येईल.. रत्नागिरीच्या पोलिसांचे विलक्षण चातुर्य, तपासातील चिकाटी, अहोरात्र मेहनत व अथक परिश्रम यामुळेच चोरटे जेरबंद झाले व मंगळसूत्र जसेच्या तसे परत मिळाले त्याची ही चित्तरकथा!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg