loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यात पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - दुसऱ्याच्या सुखात आपले सुख पाहिले पाहिजे. आपल्या ताटातला घास गरजवंताच्या मुखात घालण्याची वृत्ती जोपासली पाहीजे. जीवनात दुसऱ्यांना सुख मिळावे अशी वृत्ती हेही अध्यात्मच आहे. गौतम बुद्ध तसेच शाहु, फुले, आंबेडकर यांनी तोच मार्ग निवडला. मनात पुनर्विचार व चिंतन झाले पाहिजे. श्री श्री श्री अवधुतानंद सरस्वती महाराज तसेच (कै.) अनुराधा पिळणकर यांचे चरित्र तथा साहित्य प्रकाशित करून अच्युत पिळणकर यांनी वाचन संस्कृती जोपासनेत योगदान दिले आहेच, आणि या सोहळ्यात विविध क्षेत्रातील लोकांचा गौरव करून सामाजिक बांधिलकीही वृद्धिंगत केली आहे. विशेष म्हणजे मोबाईल अतिवापराच्या या युगात लोकांच्या हातात पुस्तक देण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मनोगत प्रसिद्ध कवी तथा स्तंभलेखक अजय कांडर यांनी बांदा येथे व्यक्त केले. बांदा येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात पिळणकर परिवारातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते लेखक तथा मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर, प्रसिद्ध शल्य चिकित्सक (स्वरूप हॉस्पिटल, सावंतवाडी) येथील डॉ. अमुल पावसकर, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, रत्नाकर पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या सोहळ्यात अच्युत पिळणकर लिखित श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज (परमपूज्य तेलंगणा) व बांदा बाल चरित्र ग्रंथ, तसेच कवयित्री स्व. अनुराधा (आशा) पिळणकर लिखित कविता व बडबड गीत संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेस या कार्यक्रमात डॉ. अमुल पावसकर यांना श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज स्मरणार्थ आश्रम पुरस्कार व कवी अजय कांडर यांना कवयित्री (स्व.) सौ. आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच बांद्याचे माजी सरपंच तथा साईमठ बांदाचे सल्लागार (कै.) ज्ञानेश्वर केसरकर यांना मरणोत्तर जीवन गौरव सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. ते त्यांच्या परिवाराने स्वीकारले. तसेच पिळणकर परिवारातर्फे रोणापाल येथील दयासागर छात्रालयाला दहा हजार रुपये छात्रालयाचे जीवबा वीर यांचेकडे प्रदान करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध मान्यवर व्यक्ती व संस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

आपल्या मनोगतात डॉ. अमुल पावसकर म्हणाले की, बांदा गावातील कोणत्याही कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा असूच शकत नाही. कारण मी बांदा गावात पाहुणा नसून हा गावच माझा आहे. एवढं प्रेम माझं या गावावर आहे आणि गावाचं माझ्यावर आहे. आज जगाला विज्ञाना बरोबर अध्यात्माची ही गरज आहे. परमेश्वर रुपी जी अदृश्य शक्ती आहे, ती विशिष्ट कार्यांसाठी विशिष्ट व्यक्तिची निवड करते. तशीच निवड करून या शक्तीने आमचे दया पिळणकरला यांना अवधुतानंद सरस्वती महाराज बनवले. डॉ. रुपेश पाटकर म्हणाले की, सुखाची भौतिक साधने वाढली आहेत. मात्र खरोखरच सर्वांना सुख प्राप्त झाले आहे का याचे उत्तर नकारार्थी आहे. आपली मुलं डॉक्टर, इंजिनिअर व्हावीत असे सर्वांना वाटते ,परंतु त्यांनी खरा परोपकारी संत व्हावे असे कोणाला वाटते का? आज नेते पैसे वाटतात आणि लोक पैसे घेतात. त्यांना ते संत तुकाराम महाराज समजून सांगण्याची गरज आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीने निरपेक्ष हेतुने दिलेला नजराणा सुद्धा नाकारला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते, सामाजिक कार्यकर्ते, माजी शिक्षक, व्यापारी, ग्रामस्थ आदीसह बहुसंख्य लोक उपस्थित होते. राकेश केसरकर यांनी पुस्तक समीक्षण केले. प्रा. समिधा आमडोसकर यांनी कै. आशा पिळणकर यांचा जीवनपट उलगडला. मान्यवरांचे स्वागत व सत्कार अनिरूद पिळणकर, आशिष पिळणकर आणि अभिजीत पिळणकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अदिती पिळणकर, सुत्रसंचालन रश्मी नाईक यांनी केले तर आभार अमृता पिळणकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg